अलिबाग- वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याच्या पेटयांची आवक सुरू झालेली असली तरी सामांन्यांना परवडेल असा आंबा बाजारात येण्यासाठी मे महिनाच उजाडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.हवामानातील बदल आणि गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याला मोहर येण्याची प्रर्किया लांबली आहे त्यामुळे आंबा पीक उशिरानं बाजारात येणार असल्याचं सांगितलं जातंय.जिल्हयात अवघ्या 50 टक्के लागवडीखालील क्षेत्रावरच मोहर येण्याची प्रर्किया सुरू झाली आहे.त्यामुळे फ़ळधारणा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी 90 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
दरवर्षी साधाऱणतः नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या आरंभी मोहर यायला लागतो.यावेळेस मोहर येण्यासाठी फेब्रुवारी उजाडला आहे.पहिल्या टप्प्यात ज्या झाडांना मोहर लागला तो आंबा सध्या बाजारात दाखल होत आहे.दुसऱ्या टप्प्यातील आंबा बोरा एवढा आहे तर तिसऱ्या टप्प्यातील आंबा मोहर येण्याच्या टप्प्यात आहे.त्यामुळे सामांन्यांना परवडेल अशा दरातला हापुस मे च्या अखेरीसच बाजारात येणार आहे.कोकणात मे च्या अखेरीसच पाऊस सुरू होत असल्याने हा आंबाही पावसाच्या तडाख्यात सापडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.येणाऱ्या आंबा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने हार्टसॅप ही योजना कार्यान्वित केली असल्याची माहिती कृषी उपसंचालक राजाराम मोरे यांनी दिली.
रायगड जिल्हयात आंबा लागवडीखाली 42 हजार हेक्टर क्षेत्र आहे.यापैकी 14हजार 500 क्षेत्र उत्पादनक्षम आहे.यातून दरवर्षी जवळपास 21 हजार 424 मॅट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते.गतवर्षी आब्याचे उत्पादन घटले होते.या पार्श्वभूमीवर यंदाचा आब्याचा मोसम कसा राहतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.