.प्रवासाला निघताना बरोबर भाकरी घेऊनच निघतो.छानसं डेरेदार झाड पाहून तिथं दुपारचं वनभोजन करायचं असा माझा रिवाज आहे.परवा बीडला जातानाही बरोबर दसम्या घेतल्या होत्या.चांगलं झाड पाहून त्याखाली बसावं म्हटलं तर कित्येक किलो मिटर पुढं गेलो तरी झाड काही सापडत नव्हतं.शेवटी एक झुडुप दिसलं.आम्ही तिथंच वनभोजन वगैरे केलं.मराठवाड्यात एवढया मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झालीय की,हीच स्थिती राहिली तर मराठवाडयात झाड दुर्मिळ होणार आणि दुष्काळही तिकडं कायमचा मुक्काम करून बसणार हे नक्की.सरकारनं मागच्या जूनमध्ये दोन कोटी झाडं लावल्याचा डांगोरा पिटला.ती रोपंही कुठंच दिसत नाहीत.’सरकारनं लावलेली झाडं दाखवा आणि हजार रूपये मिळवा’ अशी एखादी योजना फडणवीसांनी जाहीर करायला हरकत नाही.त्यात हजार रूपये कुणालाच मिळणार नाहीत हे नक्की.असो.
मी नववर्षाचे संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत कधी पडलो नाही.कारण पत्रकाराच्या आयुष्यात ठरवून काहीच होत नाही..तरीही यंदा मी ठरवलंय की,गावाकडं किमान हजार झाडं लावणार आहे.केवळ लावणारच आहे असं नाही तर ती जगविणारही आहे.मला या विषयातलं काही कळत नाही.या विषयातल्या तजज्ञांनी काही मार्गदर्शऩ केलं तर मला फायदा होईल. कोणती झाडं जास्त उपयुक्त आहेत,ती कशी लावली पाहिजेत,त्यासाठी रोपं वगैरे कुठं मिळतात, याची माहिती मिळाली तर माझी कल्पना मूर्त स्वरूपात येण्यासाठी मला मदत होईल. फ़ेसबुक मित्रांपैकी कोणी असेल तर कृपया सहकार्य करावे