रायगड जिल्हयातील म्हसळा तालुक्यात असलेल्या कोंझरी गावातील कुणबी पंच कमिटीच्या पंचांनी जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला वाळित टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हयात परत एकदा खळबळ निर्माण झाली आहे.जमिनीच्या वादातुन हा बहिष्कार टाकण्यात आला असून गोकुळाष्टमीच्या सणापासून संदश रामजी शिगवण आणि त्यांचे कुटुबिय मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करीत आहे.शिगवण कुटुंबाशी बोलणे,संपर्क ठेवण्यास बंदी घालण्यात आली असून पंचकमिटीच्या या फतव्याच्या विरोधात जो कृती करेल त्याला 200रूपये दंड आकारण्यात येईल असा आदेशही पंचकमिटीने दिला आहे.या संदर्भात संदेश शिगवण यांनी म्हसळा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मात्र अद्याप कोणालाही अटक केली गेली नसल्याचे समजते.
वाळित टाकणे हा कायद्यानं गुन्हा असताना देखील रायगड जिल्हयात वाळित टाकण्याचे प्रकार सातत्यानं घडत असल्यानं चिंता व्यक्त कऱण्यात येत आहे.