वेळ मारून नेण्यासाठी ‘निधी कमी पडू दिला जाणार नाही’ असं विधान गावच्या सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यत सारेच करतात.प्रत्यक्षात सारं गाडं निधीसाठीच अडलेलं असतं.रायगड किल्ल्याच्या बाबतीत असंच म्हणता येईल.निधी नसल्यानं महाराजांच्या राजधानीची अवस्था अक्षरशः केविलवाणी झाली आहे.निधी देण्याची आश्वासनं तर गेल्या साठ-सत्तर वर्षात असंख्य वेळा दिली गेली.मात्र हे आश्वासन पाळले कोणीच नाही.अपवाद अटलबिहारी वाजपेयीचा. वाजपेयी पंतप्रधान असताना एका कार्यक्रमानिमित्त ते रायगडावर आले होते. त्यावेळी त्यांनी रायगडासाठी एक कोटीचा निधी जाहीर केला.तो बराच उशिरा का होईना आला.त्यातून थोडी-फार कामं झाली.पंरतू खऱ्या अर्थानं रायगडचा विकास साधायचा असेल आणि महाराजांचा प्रिय रायगडचं संवर्धन करायचं असेल तर मोठया निधीची गरज आहे. तो उपलब्ध करून देण्याची कोणाची मानसिकता नाही ही वस्तुस्थिती आहे.अरबी समुद्रात शंभर कोटी रूपये खर्च करून स्मारक उभंारताय त्याचं स्वागत. पण जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत त्याकडं दुर्लक्ष करणं हे मान्य होणारं नाही. ज्या वास्तू शिवरायांच्या चरणस्पर्शानं पावन झालेल्या आहेत,जेथे शिवरायांंचं वास्तव्य राहिलेलं आहे अशा वास्तूचं जतन कऱणं ही प्राथमिकता असली पाहिजे.शिवरायांनी उभारलेले शेकडो किल्ले आज अखेरची घटका मोजत असताना त्याच्या संवर्धनासाठी फार काही होताना दिसत नाही. किल्ले रायगडच्या बाबतीतही असेच आहे.ही दुःखाची तेवढीच संतापाची गोष्ट आहे.
आज शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस रायगडावर होते त्यांनी ‘रायगडच्या विकास आणि संवर्धनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही’ हे गुळगुळीत झालेलं वाक्य पुन्हा एकदा शिवप्रेमींसमोर उदघृत केलं . हे वाक्य आपण एवढ्या वेळा एकत असतो की,ती त्यातील फोलपणा वेगळा सांगायची गरजच नसते.या आश्वालनातला वेळमारूपणा आता रायगड किल्ल्याच्याही परिचयाचा झालेला आहे.निधी कमी पडू दिला जाणार नाहीची घेोषणा कऱण्याऐवजी दह-पाच कोटीची घोषणा मख्यमंत्र्यांनी केली असती तर त्याचं स्वागत करता आलं असतं, मुख्यमंत्र्यांच्या वांझोटया घोषणेनं कोणाचंच समाधान झालं नाही हे नक्की.
रायगडावर अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत त्याची डागडुजी तातडीनं करावी लागेल,गडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावं लागेल, गडावर अंधार आहे,जे दिवे असतात त्याचं बिल भरण्याची तरतूदही नाही,अशा स्थितीत गड विजेच्या दिव्यांनी न्हाऊन निघेल अशी व्यवस्था केली तर ती सुखद अनुभुती असेल,गडावर किंवा पायथ्याशी शिवरायांचं चरित्र सांगणारा लाईट ऍन्ड साऊडचा शो निर्माण केला तर ते पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल आणि नव्या पिढीसाठी तो शो प्रेऱणा देणाराही ठरू शकेल. गडावर पाण्याची व्यवस्था करावी लागेल,पर्यटनाचा दृष्टीकोन ठेवत रायगडच्या दर्शनासाठी देशभरातून जास्तीत जास्त शिवभक्त रायगडावर येतील अशी व्यवस्था करावी लागेल,होळीच्या माळाचा विकास करावा लागेल.होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळ्याला दररोज मानवंदना दिली जायची ती बंद पडली आहे ती पुन्हा सुरू करावी आणि त्यासाठी कायम स्वरूपी निधीची तरतूद करावी, शिवसृष्टी निर्माण करता येईल, शिवाय इतिहास तज्ज्ञ आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन इतरही प्रकल्प कार्याव्नित करता येतील.
हे सारं निधी कमी पडू दिला नाही सारख्या पारंपारिक आश्वासनंांनी शक्य होणार नाही.त्यासाठी ठोस कृतीची गरज आहे.मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या विकासाचा तसा कोणताच ठोस कृती कार्यक्रम जाहिर केला नाही. ‘शिवरायांमुळं आम्ही सत्तेवर आलोत’ वगैरे विधान करून त्यांनी टाळ्या जरूर मिळविल्या ,पण त्यानं रायगडची दैना संपेल असं दिसत नाही.शिवरायांच्या आशीर्वादानं नवं सरकार सत्तेवर आलेलं असेल तर सरकारला कोणत्याही स्थितीत शिवरायांचा आणि त्यांच्या गड किल्ल्यांचा विसर पडता कामा नये.एवढीच अपेक्षा .( एस.एम.)