मोदींची भिस्त मिडिया पेक्षा सोशल मिडियावरच
पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांना भाव देत नाहीत की,त्यांना पत्रकारांपासून दूरच राहायचंय.गेल्या महिन्यातला अनुभव लक्षात घेता या दोन्ही शक्यता खऱ्या आहेत असंच मानावं लागेल.कारण पंतप्रधान झाल्यावर मोंदींनी पहिला विदेश दौरा केला तो भुतानला.या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांना घेऊन जायचं टाळलं.जे पत्रकार त्यांच्यासमवेत होते,ते दूरदर्शन आणि आकाशवाणी तसेच काही न्यूज एजन्सीचे पत्रकार होते.तेव्हा असं सांगितलं गेलं की,विमानात जागा नसल्यानं मोदींबरोबर नेहमीप्रमाणं 30-35 पत्रकारांच्या चमुला घेता आलं नाही.परंतू ते खऱं नव्हतं,कारण आता पंतप्रधान ब्राझिलच्या दौऱ्यावर जात असतानाही सरकारी पत्रकाराशिवाय ( म्हणजे दूरदर्शन-आकाशवाणी) फक्त न्यूज एजन्सीच्याच काही पत्रकारांबरोबर घेण्याचे आदेश मोदीनी दिले आहेत.पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांच्यासमवेत माध्यमांच्या प्रतिनिधींचा एक ताफा असतो.ही परंपरा आहे.पंतप्रधानांसमवेत गेलेले पत्रकार विमानात पंतप्रधाानांशी वार्तालाप करू शकत होते.परंतू मोदींनी आता हे बंद केलंय असं दिसतंय.त्यामुळे ब्राझिल दौऱ्यातही त्यांच्याबरोबर ठराविकच पत्रकार असतील.एवढंच नव्हे तर पंतप्रधान कार्यालयातील गुप्त माहिती पत्रकारांना मिळू नये याची कडेकोट व्यवस्था नरेंद्र मोदींनी केली आहे.त्यामुळं शोध पत्रकारिता कऱणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.मोदी माध्यमांसमोर न येता आपल्याला जे सांगायचे ते ट्विीटरच्या माध्यमातून सांगत असल्याने माध्यमांची मोठी अडचण झाली आहे.मोदींचे व्टिट पत्रकारांबरोबर आम जनतेलाही वाचायला मिळत असल्यानं त्यांना टीव्ही बघण्य़ाची किंवा वर्तमानपत्रं वाचण्याची गरज नाही.यात आणखी एक सोय अशी आङे की,मोदींना पत्रकारांच्या उलट-सुलट प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत नाहीत.त्याना जनतेशी एकतर्फी संवाद साधता येतो.या बदलांमुळे दिल्लीतील पत्रकारांची चांगलीच अडचण झाली आहे.माध्यमांनी निर्माण केलेल्या लाटेवर स्वार होत मोदींनी दि्ल्ल्लीत सरकार स्थापन केले पण ज्या माध्यमांनी मोदींना डोक्यावर घेतले त्या माध्यमांनाच मोदी आता टाळताना दिसतात.