दिल्लीः ध चा मा झाल्यानं किंवा उपसंपादकांच्या डुलक्यानं किती मोठी आफत येऊ शकते याचा अंदाज माध्यमात काम करणार्‍यांना नक्कीच असतो.तशीच वेळ आयएएनएस या वृत्त संस्थेवर आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातल्या एका बातमीत मोठीच गडबड झाली.त्याचा परिणाम काही पत्रकारांचे बळी गेले.काहींना नोटीस मिळाली तर काहींनी माफीनामे सादर करून सावरासावर केली.
आयएएनएस ही वृत्त संस्था अनेक दैनिकांना बातम्या पुरविण्याचे काम करते.साधारणतः वृतसंस्थाकडून येणार्‍या बातम्यांमध्ये फार काटछाट न करता या बातम्या आहे तश्या लावल्या जातात.त्यामुळं मूळ कॉपीतच दोष असेल तर तो बहुतेक ठिकाणी आहे तसाच प्रसिध्द होतो.पंतप्रधानांच्या बातमीतही असंच झालं.कृषी उत्पादनासाठी उचित मोबदला मिळावा म्हणून पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियान ही योजना सुरू केली गेली.त्यावर कॅबिनेटनं शिक्कामोर्तब केलं.ही बातमी आयएएनएस ने कव्हर केली.मात्र बातमीद नरेंद्र मोदींच्या समोर ‘कारण नसताना बकबक करणारा व्यक्ती”अशा अर्थाचा एक आक्षेपार्ह शब्द जोडला गेला.ती बातमी सर्वत्र फ्लॅश झाली.
मात्र नंतर बातमीतला महाघोटाळा लक्षात आल्यानंतर डॅमेजकंट्रोल सुरू झालं.सर्वात अगोदर ही बातमी वेबसाईटवरून हटविली गेली.त्यानंतर संस्थेचे ब्युरो चीफ आणि पॉलिटिकल ब्युरो चीफ या दोघांकडून राजीनामा घेतला गेला.रिपोर्टरला तात्काळ निलंबित केले गेले.तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले.संपादकांना कारणे दाखवा नोटीस पाठविली गेली.कार्यकारी संपादक हरदेव सनोत्राने लेखी माफीनामा सादर केला.
असं सांगितलं जातंय की,ऑटोकरेक्शनमधील गडबडीमुळं ही चूक झाली..ही चूक मुद्दाम झाली,तांत्रिक कारणांमुळं झाली की,उपसंपादकाची डुलकी याला कारणीभूत आहे याचा शोध चौकशीअंती लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here