मोदींचे एकही भाषण “कॉंग्रेस उल्लेख मुक्त” का नसते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून फक्त कॉंग्रेस आणि कॉग्रेसलाच टार्गेट का करताहेत ? त्याचं एकही भाषण “कॉंग्रेस उल्लेख मुक्त” का नसते? एकीकडे कॉंग्रेस हा दुबळा, विकलांग झालेला पक्ष आहे म्हणायचे, पुढील शंभर वर्षे पक्ष सत्तेत येणार नसल्याचा शापही द्यायचा आणि टीकाही फक्त कॉंग्रेसवरच करायची… का? भाजपाला कॉंग्रेसची भिती वाटतेय का? तसं नसेल तर भाजपाला ध्यानी मनी कॉग्रेस का दिसतेय? जो पक्ष पुढील शंभर वर्षे सत्तेवर येऊ शकत नाही अशा “क्षुल्लक” पक्षाची पंतप्रधानांनी दखल घेण्याचं कारणच काय? कालचं मोदींचं संसदेतील भाषण बघा, पंतप्रधानांनी भाषणाचा जास्तीत जास्त वेळ कॉग्रेसवर टीकास्त्र सोडण्यात घालविला.. कॉग्रेसने देशभर कोरोना पसरविला, कॉंग्रेस ही तुकडे तुकडे गॅंगचं नेतृत्व करते इथपासून कॉग्रेसचा मेक इन इंडियाला विरोध असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले.. मला तुलना करायची नाही पण कालच्या पंतप्रधानांच्या भाषणापेक्षा अगोदरचे राहूल गांधी यांचे भाषण मुद्द्यांना धरून होते.. राहूल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरं देण्या ऐवजी पंतप्रधान त्यांच्यावर हल्ले करीत राहिले.. याचा अर्थ असा की कॉग्रेस कितीही विकलांग, विस्कळीत झाली असली आणि लता दिदी च्या अंत्ययात्रेस उपस्थित राहण्याचंही त्राण या पक्षात नसलं तरी भाजपला जळी स्थळी फक्त कॉंग्रेस दिसते.. भाजपावाले देखील हे वास्तव खासगीत मान्य करतात.. मग प्रश्न पडतो की, ज्या पक्षाचे संसदेत पन्नास खासदार देखील नाहीत अशा पक्षाला संसदेत विक्रमी बहुमत असलेला पक्ष का घाबरतोय? काही कारणं नक्की आहेत..
कोणत्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे, नाही, कुठे किती आमदार आहेत? हे सोडा.. कॉंग्रेसची पाळंमुळं देशभर खोलवर रूजलेली आहेत..हे वास्तव आहे.. कोणी काहीही म्हणत असले तरी एक गोष्ट सर्वांना मान्य करावी लागेल की, कॉंग्रेस हा एकमेव असा विरोधी पक्ष आहे की, जो आजही देशभर आपलं अस्तित्व टिकवून आहे.. ममता पश्चिम बंगाल पुरत्या , केजरीवाल यांचा करिश्मा दिल्ली पुरता , सपा, बसपा युपी पुरते तर ,जद, राजद बिहार पुरते, एआयडीएमके तामिळनाडू पुरते, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेर फारसं अस्तित्व नाही, अकाली दल पंजाब पुरता आहे… मोदींसाठी हे सर्व प्रादेशिक पक्ष आहेत.. त्यांच्या मर्यादा आणि महत्त्वाकांक्षा देखील मोदींना ठाऊक आहेत.. यापैकी कोणीही दिल्लीचे तख्त काबिज करायचे असा निश्चय करून राजकारण करीत नाही.. त्यांना फक्त आपली संस्थानं म्हणजे राज्ये सांभाळायची आहेत.. म्हणूनच मोदी जेव्हा या पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात जातात तेव्हाच त्यांच्या विषयी बोलतात .. राष्ट्रीय व्यासपीठावर त्यांची दखल ही ते घेत नाहीत.. कारण त्यांना त्यांचं भय नाही.. कॉंग्रेसचं असं नाही.. प्रदीर्घकाळ केंद्रात सत्ता उपभोगलेलया कॉंग्रेसला केवळ केंद्रीय सत्तेतच रस आहे.. हे मोदींना माहित असल्याने ते कॉग्रेसला शत्रू नंबर एक समजतात.. “कॉंग्रेस मुक्त भारत” या घोषणेमागचे सूत्र देखील हेच आहे..किवा पप्पू म्हणून राहूल गांधींची होणारी टिंगलटवाळी याच धोरणाचा भाग म्हणावा लागेल.. विरोधाभास असाय की, कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न पाहणारे भाजप नेते “कॉंग्रेस उल्लेख मुक्त” “भाषणही करू शकत नाहीत
आणखी एक मुद्दाय … कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी हे थेट नरेंद्र मोदी यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवितात..सत्तेचे वाभाडे काढतानाची त्यांची भाषा रोखठोक, स्पष्ट असते.. अन्य विरोधी नेते प्रसंगानुरूप, हातचं राखून मोदींवर बोलत असतात हे आपण वारंवार पाहिलं आहे.. काही पक्ष असेही आहेत की, ते विरोधात जरी असले तरी केंद्रीय सत्तेला सांभाळून असतात, केंद्राशी पंगा घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत.. काही पक्ष सोयीनुसार वारंवार भूमिका बदलत राहतात.. काही पक्ष तर चक्क मोदिंना घाबरतात, काहींना मोदींकडून काही मिळवायचेही असते.. कॉंग्रेस असं करीत नाही आणि ती तसं करूही शकणार नाही.. म्हणूनच कॉंग्रेसला ठेचण्याचा भाजपचा सतत प्रयत्न असतो.. कॉग्रेस एकदा उखडली गेली की, देश पातळीवर भाजपला आव्हान देणारा एकही पक्ष शिल्लक राहणार नाही.. हे भाजपला पक्कं माहिती आहे..
खरं म्हणजे केवळ भाजपलाच कॉंग्रेसचे भय आहे का? तर असं नाही .. अन्य विरोधी पक्षांना देखील कॉंग्रेसबद्दल आसुयाच, द्वेषच आहे.. म्हणूनच ते कॉग्रेसला वगळून विरोधी आघाडी बनविण्याची भाषा करतात.. तसं शक्य असतं तर प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेसला बाजुला ठेऊन विरोधी आघाडी केव्हाच केली असती.. तसे प्रयत्न करून पाहिलेही गेले.. ते यशस्वी झाले नाहीत.. विरोधकांना आघाडीचं नेतृत्व कॉग्रेसला द्यायचं नाही.. कॉग्रेस त्याला तयार होणार नाही.. या आघाडीच्या नेतृत्वासाठी शरद पवार यांच्यासह अनेकजण उत्सुक आहेत.. पण ते होत नाही.. मध्यंतरी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला गेला.. एक बैठक घेतली गेली, त्याचं निमंत्रण कॉंग्रेसला नव्हतं.. बैठकीचा आणि “कॉग्रेस वगळून” भूमिकेचा फज्जा उडाला..तेव्हा संजय राऊत यांनी जाहिरपणे मान्य केले की, “कॉग्रेसला वगळून देशात विरोधी आघाडी होऊ शकत नाही” .. याचा अर्थच असाय की, कॉंग्रेसचं महत्व आजही दोन्ही आघाड्यांवर टिकून आहे.. कॉग्रेस या संधीचा फायदा उठविण्यात कमी पडते हे सत्य आहे.. असं नसतं तर राहूल गांधी लता दिदी च्या अंत्यदर्शनासाठी आले असते.. कॉंग्रेसला वाटते दिदी हिंदुत्ववादी, सावरकरवादी होत्या.. असतीलही.. त्याचं काय? सवत:राहूल गांधी यांनी देखील आपण जाणवेधारी हिंदू आहोत असं जाहीर केलंच होतं की…मग? शिवाय दिदी फक्त सावरकरवादी नव्हत्या.. त्या भारतरत्न होत्या.. देश – विदेशातील कोट्यवधी रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले आहे.. अशा स्थितीत वैचारिक मतभिन्नता विसरून त्यांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी येणं अपेक्षित आणि अनिवार्य होतं.. ती संधी कॉंग्रेसने गमविली..ही जखम लता दिदींवर प्रेम करणारया प्रत्येकाच्या मनात कायम राहिल.. त्याचा फटका ही पक्षाला बसू शकतो.. कॉंग्रेस अशा चुका वारंवार करते, चुकांपासून काही शिकण्याची मानसिकताच या पक्षात नाही.. ही मानसिकता बदलली नाही तर मोदी म्हणतात तसे पुढील शंभर वर्षे कॉंग्रेस सत्तेवर येणार नाही..
एस. एम. देशमुख