मुंबई-गोवा महामार्गालाही मिळणार आशिया हायवे नंबर
जे.डी.पराडकर
संगमेश्वर : देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या क्रमांकाचे सुसुत्रीकरण आणि आशीयाई देशांच्या दळणवळणाच्या दृष्टीने आता महाराष्ट्रात असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या बदललेल्या क्रमांकाबरोबरच आशिया हाय वे (ए.एच.) चे क्रमांकही प्रत्येक मैलदगडांवर टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे आता मुंबई – गोवा महामार्गावरील मैलदगडांवर एन.एच. क्रमांकाबरोबरच ए.एच. क्रमांकही पाहायला मिळणार आहेत.
हे सर्व क्रमांक सुटसुटीत करतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आशियाई देशांच्या दळणवळणाच्या दृष्टीने प्रत्येक राष्ट्रीय महामार्गाच्या मैलदगडांवर एन.एच. क्रमांकासोबतच ए.एच. क्रमांक टाकण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा बदल मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीतही लागू पडणार आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पूर्वीचा असलेला एन.एच. १७ नंबर बदलून आता तो एन.एच. ६६ असा करण्यात आला आहे. परिणामी मुंबई ते गोवा असा प्रवास करणार्या देशविदेशातील पर्यटकांना आता एन.एच. ६६ बरोबर मैलदगडांवर ए.एच हा नवीन क्रमांकही पाहायला मिळणार आहे. संगणकीकरणाच्या युगात आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ए.एच. क्रमांकामुळे जीपीएसद्वारे रस्ते मार्ग शोधताना अधिक सुलभ होणार आहेत. अनेक राज्यातील राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक यापूर्वी मिळते जुळते होते यामुळे इंटरनेट अथवा जीपीएसद्वारे मार्गाचे नेव्हीगेशन करताना अडचण निर्माण होत होती यावर सुलभ प्रक्रिया म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हा ए.एच. क्रमांक फायदेशीर ठरणार आहे शिवाय महामार्गांच्या क्रमांकांचे सुसुत्रीकरण करणेही सोपे जाणार आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती ७८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केली. सुरुवातीला धुळीचा असलेला हा रस्ता पुढे खडीचा झाला. काही वर्षांनी त्यावर डांबर टाकून ब्रिटिशांनी या मार्गाचे दुपदरीकरण केले आणि याची ओळख राष्ट्रीय महामार्ग अशी करण्यात आली. या मार्गाला ५० वर्षांपूर्वी एन.एच. १७ असा क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या प्रक्रियेत हा क्रमांक ६६ असा करण्यात आला. आता या क्रमांकाबरोबरच ए.एच. चा नवा क्रमांकही मुंबई – गोवा महामार्गावरील मैलदगडांवर पाहायला मिळणार आहे.