महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेले ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे त्रैमासिक आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या त्रैमासिकाला नव्या पिढीशी जोडण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला असून, महेंद्र मुंजाळ यांची पत्रिकेच्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या कार्यध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. आतापर्यंत दत्तो वामन पोतदार, माधवराव पटवर्धन, के. नारायण काळे, आनंद यादव, शंकर सारडा यांच्यासारख्या दिग्गजांनी पत्रिकेचे संपादकपद भूषवले आहे. गेली दहा वर्षे संपादक असलेल्या सु. प्र. कुलकर्णी यांच्याकडून मागील एका अंकात एक अक्षम्य चूक झाल्याने त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे कुलकर्णी यांनी स्वच्छेने संपादकपदाचा राजीनामा दिला होता. आता ही जबाबदारी मुंजाळ यांच्यासारख्या युवा संपादकाकडे सोपवण्यात आली आहे. मुंजाळ हे पत्रिकेचे २५वे संपादक ठरले आहेत.
‘कुलकर्णी यांनी संपादित केलेला एप्रिल ते सप्टेंबरचा अंक प्रकाशित झाल्यानंतर पुढील अंकापासून मुंजाळ संपादकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत,’ अशी माहिती वैद्य यांनी दिली. सध्याचा काळ टेक्नोसॅव्ही असल्याने साहित्य पत्रिकेलाही तंत्रज्ञानाची जोड देण्यावाचून पर्याय नाही. सध्या साहित्य परिषदेचे अकरा हजार सदस्य आहेत. डिसेंबर महिन्यापासून पत्रिकेचा अंक masapapune.org या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. (मटावरून साभार)