नवी दिल्ली, दि. ४ – दिल्लीतील बहुचर्चित निर्भया बलात्कारप्रकरणातील नराधमांची मुलाखत दाखवण्यावर बंदी टाकण्यात आली आहे. माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयाने ही मुलाखत दाखवू नये असे निर्देश प्रसारमाध्यमांना दिले असून दिल्लीतील हायकोर्टानेही मुलाखत दाखवू नये असे आदेश दिले आहेत.
अंगावर शहारे आणणा-या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांनी एका माहितीपटासाठी मुलाखत दिली आहे. इंडियाज डॉटर असे या माहितीपटाचे नाव असून बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या पत्रकार लेस्ली उडविन यांनी हा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटात निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने संतापजनक विधान केले होते. या मुलाखतीचे काही अंश प्रकाशित होताच मुलाखतीविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मुकेश सिंह सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तुरुंगप्रशासनाने शिक्षा भोगणा-या गुन्हेगाराची मुलाखत घेण्याची परवानगी कशी दिली असा सवालही आता उपस्थित होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालय व दिल्ली पोलिसांनीही या मुलाखतीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुलाखतीविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच माहिती व प्रसारण मंत्रालयाने मुलाखत दाखवण्यास निर्बंध घातले.
दरम्यान, लोकसभा व राज्यसभेतही या प्रकरणावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करुन नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास दोषींवर कारवाई करु अशी ग्वाही दिली. डॉक्यूमेंटरीसाठी तुरुंग प्रशासनाने सशर्त परवानगी दिली होती. या अटींचे उल्लंघन झाले का याचा तपास करु असे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले. तर माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी यूपीए सरकारच्या काळात या माहितीपटासाठी परवानगी देण्यात आली होती असे सांगत काँग्रेसकडे बोट दाखवले.