पुणे येथील एका महाविद्यालयातील 14 विद्यार्थी मुरूड जंजिर्याच्या समुद्रात बुडून मृत्युमुखी पडल्यानंतर रायगड जिल्हयातील मुरूड,काशिद,अलिबाग येथील समुद्र किनार्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.मुरूडमधील दुर्घटनेची पडसाद विधानसभेत उमटले आणि न्यायालयातही त्याबाबत धाव घेतली गेली.त्यानंतर न्यायालयाने समुद्र किनार्यावर सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याचे आदेश सरकारला दिले होते.या घटनेला दहा महिने झाल्यानंतर आता मुरूड येथील समुद्र किनार्यावर एक टेहळणी मनोरा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.किनार्यावरील काही जागांची पाहणी केल्यानंतर विश्रामगृहाच्या जवळची जागा मनोर्यासााठी निवडण्यात आली आहे.सरकारने या कामासाठी जिल्हाधिकार्यांकडे निधी दिल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्याने मुरूडकरांनी त्याचे स्वागत केले आहे.येत्या काही महिन्यात मनोर्याचे काम पूर्ण होणार आहे.मुरूडच्या विस्तीर्ण किनार्याच्या मध्यभागी हा मनोरा उभारला जात असल्याने तेथून संपूर्ण किनार्याची टेहळणी कऱणे शक्य होणार आहे.मात्र या मनोर्याबरोबरच तेथे अत्याधुनिक दुर्बिण उपलब्ध झाल्यास किनार्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेबरोबरच समुद्रातील दूरच्या हालचाली दुर्बिणीतून टिपणे शक्य होणार असल्याने तेथे दुर्बिण बसविण्यात यावी अशी मुरूडकरांची मागणी आहे.टेहळणी मनोर्यात एक सुरक्षा रक्षक कायम ठेवला जाणार असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेची तो काळजी घेईल असे बोलले जाते.अलिबागचा समुद्र किनाराही विस्तीर्ण असल्याने तेथेही टेहळणी मनोरे उभारावेत अशी मागणी आता केली जाऊ लागली आहे.