बर्याच ‘वर्षांनी’ काल मुंबई मराठी पत्रकार संघात जाण्याचा योग आला.माझ्याबरोबर किरण नाईक,परिषदेचे नवे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा आणि परिषदेच्या सोशल मिडिया सेलचे शरद काटकर होते.अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी अत्यंत प्रेमानं, आपलेपणानं आमचं स्वागत केलं.खरं म्हणजे मराठी पत्रकार परिषद आणि मुंबई मराठी पत्रकार संघ या दोन संस्था परस्परांच्या स्पर्धक नाहीत.पुरक आहेत.दोन्हींची स्थापनाही एक वर्षांच्या फरकानं झालेली आहे.परिषदेनं महाराष्ट्रात काम करायचं आणि मुंबई संघानं मुंबईत असं स्थापना होतानाच ठरलं होतं.दोन्हीकडचे संस्थापकही एकच होते.मुबंई मराठी पत्रकार संघ परिषदेशी संलग्न होता.मात्र मधल्या काळात व्यक्तिगत रागलोभातून मुंबई संघानं परिषदेपासून फारकत घेतली.यामध्ये दोन्ही संस्थांचं आणि पत्रकार चळवळीचं मोठं नुकसान झालं यात शंकाच नाही.हे पाप ज्यांनी केलं ते आज संघातून बाजुला फेकले गेले आहेत.त्यामुळं जे झालं ते उगळीत बसण्यापेक्षा एक सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन दोन्ही संस्थानी एकत्र येत पत्रकारांच्या हिताच्या चार गोष्टी केल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं.तशी सुरूवात कालच्या आमच्या भेटीनं झाली आहे असं समजायला हरकत नाही.नरेंद्र वाबळे आणि त्यांची टीम सत्तेवर आल्यानंतर संघात पत्रकारांचा राबता वाढला,उपक्रमशीलता वाढली,विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत ही संघातील बदलाची लक्षणं आहेत असं मला वाटतं.मुंबई संघाकडून हीच अपेक्षा आहे.कधी काळी मुंबई मराठी पत्रकार संघ म्हणजे मुंबईतील चळवळीचं केंद्र होतं.सीमा प्रश्न असू देत,संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू देत किंवा कामगारांचे लढे असू देत त्याची सूत्रं मुंबई संघातून हलविली जायची.दुदैर्वानं मधल्या काळात काही नकारात्मक भूमिका घेणारी,संस्थेच्या हितापेक्षा स्वतःच्या इगोला कुरवाळत बसणारी मंडळी संघाची कारभारी झाल्यानं संघाच्या कार्याची सारी घडी विस्कटली गेली.तिकडे कोणी फिरकसणासे झाले,तीच ती चार दोन डोकी दिसायची.उपक्रम नाहीत,कामात नाविन्य नाही.अशी स्थिती होती.त्यामुळं संघाच्या कार्यात एक साचलेपण आलं होतं.आता पुन्हा संघात बदल होतोय ही पत्रकार चळवळीसाठी नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे.निधी संकलनापासून ते विविध कार्यक्रमांपर्यंत हा बदल जाणवू लागला आहे.मुंबई मराठी पत्रकार संघ पुन्हा एकदा कात टाकतो आहे हे महत्वाचे आहे.नरेंद्र वाबळे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा.,नरेंद्रजी,परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नेहमीसाठी आपल्याबरोबर आहे…
SM