मुंबई मराठी पत्रकार संघात देवदास मटाले एकाकी

0
735

एस.एम.देशमुख यांना केलेला विरोध मटालेंच्या अंगलट

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निधी संकलन समितीच्या आज झालेल्या बैठकीत पत्रकार संघाचे स्वयंघोषित सर्वेसर्वा देवदास मटाले एकाकी पडले. बैठकीत उपस्थित झालेल्या एकाही प्रश्‍नाला देवदास मटाले समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यानं त्यांची कोंडी झाली.एस एम देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाच्या सभागृहात आज एक कार्यक्रम होणार होता.त्यासाठी आठ दिवसांपुर्वी  संयोजकांनी सभागृहाचं रितसर बुकींग देखील केलं होतं.मात्र एस.एम.देशमुख प्रमुख पाहुणे आहेत म्हणून  देवदास मटाले यांनी मनमानी करीत हॉलचं बुकींग रद्द केलं.’एस.एम.देशमुख यांना बोलावत ना मग तुम्हाला आम्ही सभागृह देणार नाही’ अशी अरेरावी मटाले यांनी संयोजक विलास गावरस्कर यांच्याशी केली.त्यामुळं त्यांना हा कार्यक्रम बोरिवलीत घ्यावा लागला.ही माहिती आज सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आजच्या बैठकीत उमटले.एस.एम.देशमुख नक्षलवादी आहेत काय,?त्याचे अतिरेक्यांशी संबंध आहेत काय,?  किंवा भडकावू भाषणे करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याबाबत त्यांच्यावर पोलिसांचा काही आक्षेप आहे काय? असे प्रश्‍न मटाले यांना विचारले गेले.त्यावर मटाले निरूत्तर झाले.’देशमुख,नाईक  माझ्या विरोधात अपप्रचार करतात’ अशी टेप ते वाजवू लागले पण अपप्रचार करतात म्हणजे नेमके काय करतात? हे मात्र त्यांना सांगता आले नाही.मुंबई मराठी पत्रकार संघ आण मराठी पत्रकार परिषद यांच्यात जागेचा वाद आहे.त्यासंबंधात देशमुख आग्रही असतील तर तो अपप्रचार आहे असं कसं म्हणता येईल? असाही मुद्दा उपस्थित केला गेला.त्यावरही मटाले यांना तोंडात मिठाची गुळणी घेऊनच गप्प बसावे लागले.

‘एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांच्या कोणत्याही कार्यक्रमास हॉल उपलब्ध करून देऊ नये’ असा ठराव कार्यकारिणीने घेतल्याची लोणकढी थाप मटाले यांनी मारली मात्र कोणत्या बैठकीत हा ठराव झाला? त्याचे मिनिटस् द्या अशी मागणी केल्यानंतर मटाले पुन्हा तांडावर आपटले. मग त्यांनी देशमुख प्रमुख पाहुणे असलेला कार्यक्रमास हॉल न देण्याचा निर्णय माझ्या  माझ्या व्यक्तिगत अधिकारात घेतल्याचे सांगून विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.( व्यक्तिगत अधिकारात काही निर्णय घेतला असेल तर मटाले यांनी ते सोशल मिडियातून जाहीर करावे,सभागृह रद्द करण्याच्या निर्णयाशी पत्रकार संघाचा संबंध नाही असंही स्पष्टीकरण त्यानी द्यावं असंही त्यांना सांगण्यात आलं आहे.)मात्र व्यक्तिगत अधिकारात मटाले उद्या पत्रकार भवनाची इमारतही विक्रीस काढतील ते चालेल काय ? असां मुद्दा उरतोच.आश्‍चर्य असे की,हे सारे प्रश्‍नोत्तरे होत असताना विद्यमान विश्‍वस्त अजय वैद्य तसेच कुमार कदम हे मटाले यांचे होणारे वस्त्रहरण शातपणे बसून बघत होते.अजय वैद्य यांनी हात झटकत ‘काल मटाले यांनी जो प्रकार केला ते मला माहिती नाही’ असे जाहीर  करून मटालेंच्या मनमानीबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.आश्‍चर्य म्हणजे मटाले ज्यांच्या जिवावर टणाटणा उडया मारतात ते कुमार कदमही आज मटालेंच्या मदतीला धावले नाहीत.मला काहीच माहिती नाही अशी नरो वा कुंजरोवाली भूमिका घेत त्यांनी मटालेंची मदत कऱण्यास असमर्थता दर्शविली.कारण विषयाचं गांभीर्य आणि बैठकीतलं वातावरण पाहून त्यांनाही अशीच भूमिका घेण्याशिवाय मार्ग नव्हता। त्यामुळं देवदास मटाले आज एकाकी पडल्याचे चित्र दिसले.

मध्यंतरी मराठी पत्रकार परिषदेचा एक कार्यक्रम ठाण्यात झाला.वयोवृध्द पत्रकार दिनू रणदिवे यांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने 92 हजारांची थैली अर्पण करून त्यांचा सत्कार केला गेला.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमास उध्दव ठाकरे तसेच स्व.अरूण टिकेकर यांनी येऊ नये यासाठी देवदास मटाले यांनी मातोश्रीचे उंबरे झिजविल्याची बातमी तेव्हा सोशल मिडियावर झळकली होती.आपण मातोश्रीवर गेल्याचे मटाले यांनी आज नाकारले पण ‘उध्दव ठाकरे यांनी देशमुख यांच्या कार्यक्रमास जावू नये म्हणून उध्दव ठाकरेंना पत्र दिले होते’  हे मात्र त्यांनी मान्य केले.याचं कारणही त्यांनी फारच विनोदी दिले.परिषदेने रणदिवेंचा सत्कार केला पण लोकसत्ताचे कृ.पा.सामक  यांचा सत्कार केला नाही म्हणून हे पत्र दिले होते असा बिनबुडाचा खुलासा मटाले यांनी केला.यावर काही सभासदांनी मराठी पत्रकार परिषदेने कुणाचा सत्कार करायचा,कुणाला बोलवायचे यामध्ये लुडबुड कऱण्याचे पत्रकार संघाला काहीच कारण नाही असे सांगत मटाले यांचे चांगलेच कान उपटले. यावरही मटाले निरूत्तर झाले.उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमास विरोध करणार्‍यांचेही नाव न घेता वस्त्रहरण केले होते.त्यातून पत्रकार संघाची निचक्की झाल्याची बाबही मटालेंच्या नजरेस आणून दिली गेली त्यावरही गप्प बसण्याशिवाय मटालेंच्या हाती काहीच राहिले नाही.त्यामुळं आपण पत्रकार संघाचे मालक नाहीत किंवा पत्रकार संघाची मालमत्ता म्हणजे आपली जहागिर नाही याची जाणीवही आज मटाले यांना झालेली असू शकते. एकूण देवदास मटाले आज पत्रकार संघात एकाकी पडल्याचे चित्र आजच्या बैठकीत दिसले.आजच्या बैठकीस भारतकुमार राऊत,सुकृत खांडेकर,नरेंद्र वाभळे,प्रसाद मोकाशी तसेच विद्यमान विश्‍वस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here