मुंबईः आपल्या विविध मागण्यांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकार येत्या 26 नोव्हेंबर रोजी राज्यभर धरणे आंदोलन करीत आहेत.या आंदोलनात राज्यातील पत्रकारांच्या बहुसंख्य संघटना सहभागी होत आहेत.मुंबईतील पत्रकारांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
मुंबईतील पत्रकारांच्या हक्कासाठी सातत्यानं रस्त्यावर उतरून आणि न्यायालयीन लढाई लढणार्या बीयुजेने पत्रकारांच्या 26 च्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.बीयुजेचे सरचिटणीस इंदरकुमार जैन यांनी ट्टिटकरून पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबईतील पत्रकारांच्या हक्काची संघटना असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे यांनीही 26 तारखेच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.आम्ही राज्यातील पत्रकारांबरोबर आहोत आणि सरकारनं पत्रकारांच्या मागण्यांची तातडीनं पूर्तता केली पाहिजे अशी मागणीही वाभळे यांनी केली आहे.
टीव्हीमध्ये काम करणार्या पत्रकारांची प्रभावी संघटना असलेल्या टीव्हीजेए देखील राज्यातील पत्रकारांसमवेत आहे.टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी देखील पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.राज्यातील टीव्हीच्या पत्रकारांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं आहे.
संपादकांची संघटना असलेल्या संपादक परिषदेचे श्री.बिरवटकर यांनी आज आपल्या संघटनेचा या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबई आणि राज्यातील इतर संघटना देखील या लढयात सहभागी होत असल्यानं सोमवारचं पत्रकारांचं आंदोलन निर्णायक आणि ऐतिहासिक ठरेल असा विश्वास पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.