ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांचे प्रतिपादन
देश बदलला, लोक बदलले, पण मिडिया मात्र बदलली नाही, ही बाब माध्यमांसाठी, तसेच लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्यासाठी अत्यंत गर्वाची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांनी येथे केले. ग्रामीण प्रसार माध्यम कार्यशाळेच्या येथे आयोजित कार्यक्रमात आपले बिजभाषण केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दुबे यांनी भाष्य करण्याचे टाळत हे प्रतिपादन केले.
उल्लेखनीय म्हणजे, दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जुन्या नोटाबंदीसंदर्भात माध्यामांवर टीका करताना म्हटले होते की, देश बल रहा, लोग बदल रहे, लेकीन मिडिया नही बदला, अशी माध्यमांवर टीका केली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात प्रकाश दुबे म्हणाले की, या प्रश्नावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. मात्र, एवढे नक्की म्हणेन की, मिडिया बदलला नाही, ही गर्वाची गोष्ट आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे माझे अत्यंत निकटचे मित्र आहेत.
१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लागू केली त्यावेळी पीयूष गोयल, रजत शर्मा आणि अरुण जेटली विद्यार्थी परिषदेत आघाडीवर होते. इंदिरा गांधींनी आणिबाणी लावून व्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुध्द वृत्तपत्रांनी लढा देऊन मिळवलेल्या दुसऱ्या स्वातंत्र्याचे लालकृष्ण अडवाणी आणि अरुण जेटली यांनी जोरदार कौतुक केले होते. आणिबाणी उठल्यानंतर जनता पक्ष सत्तेत आला. अरुण जेटली हे लालकृष्ण अडवाणींचे लाडके असल्याने त्यांना राज्यसभेत घेऊन मंत्रीपद देण्यात आले होते. अरुण जेटली जनतेतून कधीच निवडून आले नाहीत. ते आता नरेंद्र मोदींच्या जवळचे झाले आहेत. आजही ते संसदेत निवडून आलेले नाहीत. तरीही मोदी यांनी त्यांना अर्थमंत्रीपद दिले आहे. मिडिया बदलला नाही, याचा अर्थ सरकारवर टीका करण्याचे मिडियाने सोडलेले नाही, असे जेटली यांना म्हणायचे आहे. सत्तेत आल्याबरोबर जेटलींचा मिडियाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
यावेळी टेलिग्राफचे जयदीप हर्डीकर, यांनीही मिडिया बदलला नाही ही बाब मिडियासाठी अभिमानाची असल्याचे सांगितले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंग यांनी, प्रास्ताविक पीआयबीचे संजय आर्वीकर, तर आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश गोरख यांनी मानले. दिवसभात चार सत्रात झालेल्या क़ार्यशाळेत अनिल महात्मे, न.मा. जोशी, सुनील डबीर, नितीन खेडकर, प्रशांत देशपांडे, राजेश खवले व आचार्य कूल, वर्धाचे कार्यकारी संचालक डॉ. सोहम पंडय़ा यांनी मार्गदर्शन केल.