बेंगलुरू ः राजकीय पक्ष कोणताही असो मिडियाच्या बाबतीत त्या सर्वांची भूमिका,मतं मात्र समान असतात.आपल्याला अडचणीत आणणारी बातमी आली की,मिडियावर अंकुश आणण्याची भाषा ते करतात,आणि बर्याचदा तशी कृती करण्याचाही प्रयत्न करतात.कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी देखील याला अपवाद नाहीत.वास्तवात कस्तुरी न्यूज नावाच्या एका चॅनलचे ते मालक आहेत.त्यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांच्याकडं कस्तुरी न्यूजचं संचालन आहे.असं असतानाही त्यांनी परवा एका कार्यक्रमात बोलताना मिडिया हमारा मजाक उडाती है,इसे नियंत्रित करणे के लिए कानून की जरूरत है असं म्हणत कर्नाटकात लवकरच मिडियाला चाप लावणारा कायदा करण्याचा कुमारस्वामी प्रयत्न करणार याचे संकेत त्यांनी दिले.
कर्नाटकात कॉग्रेस आणि जेडीएसचे आघाडी सरकार आहे.राज्यातील आघाडी सरकार कोसळणार असल्याच्या बातम्या सातत्यानं माध्यमातून प्रसिध्द होत आहेत.त्यामुळं कुमारस्वामी अस्वस्थ आहेत.ही अस्वस्थतः त्यानी म्हैसूरमधील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.ज्येष्ठ पत्रकार प्रसन्नकुमार यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकाचे विमोचन कुमारस्वामी यांच्या हस्ते शनिवारी झाले.यावेळी बोलताना त्यांनी मिडियाच्याविरोधात भरपूर तोंडसुख घेतलं.ते म्हणाले,आपण आमची प्रतिमा मलिन करून कोणाला मदत करू इच्छिता,मी यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच एक कायदा करण्याचा विचार करतो आहे.मिडिया टिकेच्या नावावर राजकीय नेत्यांना बदनाम करीत आहे.कोणताही पुरावा नसताना राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचा परवाना तुम्हाला कोणी दिला.न्यूज चॅनल्स ज्या प्रकारे बातम्या दाखवत आहेत त्यामुळं मी दुःखी झालो आहे.मी अलिकडे या चॅनल्सपासून दूरच राहणे पसंत करतो.वाहिन्यांनी अंदाज वर्तविण्यापेक्षा रचनात्मक बातम्या प्रसारित करण्यावर भर दिला पाहिजे असा सल्लाही कुमारस्वामी यांनी दिला.
कुमारस्वामी यांच्या कुटुूंबातील तीन सदस्य लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.हे तीनही उमेदवार मिडियासाठी टिकेचा विषय ठरले होते.कुमारस्वामींना हे मान्य होण्यासारखे नव्हते.तसेच आघाडीतील काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या देखील सातत्यानं येत असतात कुमारस्वामी यांना ते देखील मान्य नाही.त्यामुळं ते मिडियावर नाराज आहेत.