हरियाणात आज टाइम्स नाऊची ओबी व्हॅन जाळली गेली.आज तकच्या रिपोर्टर,फोटोग्राफरला मारहाण झाली.अन्य एका चॅनलाचा रिपोर्टरला पिसाट सुटलेल्या हल्लेखोरांनी घेरलं होतं पण तो आपले प्राण वाचवून पळण्यात यशस्वी झाला.काही रिपोर्टर-फोटोग्राफरच्या टू व्हिलर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.या सार्यामागं काही सूत्र किंवा योजना नसेल असं मी मानत नाही.याचं कारण जेव्हा जमाव असा प्रक्षुब्ध होतो तेव्हा त्याचं पहिलं टार्गेट मिडियाच असतो.रजा आकादमीच्या मोर्चाच्या वेळेसही हेच घडलं.तीन-चार ओबी व्हॅन तेव्हाही जाळल्या गेल्या.रिपोर्टरला मारलं गेलं.आसाराम बापू प्रकरणातही हेच चित्र दिसलं होतं.हे का घडतं.यामागं दोन कारण असू शकतात.एक तर मिडियावर हल्ला केला की,त्याला व्यापक प्रसिध्दी मिळेल असा एक होरा असतो त्यातून असे हल्ले होत असावेत.दुसरं कारण असंही असू शकतं की,आपण जो धुडगुस घालणार आहोत तो जगासमोर येऊ नये यातूनही मिडियाला टार्गेट केलं जात असावं.कारण काहीही असावं मात्र मिडिया सॉफ्ट टार्गेट ठरतो हे वारंवार दिसून आलं आहे.याचं कारण मिडियाला कोणतंही संरक्षण नाही.मिडिया कर्मचारी समोर असतात आणि त्यांच्यावर हल्ला करणं तुलनेत सोपं असतं.अनेकांचे हितसंबंध मिडियामुळं दुखावलेले असल्यानं एक सुप्त रागही मिडियाबद्दल अनेकांच्या मनात असतो.त्यातूनही असे प्रकार घडतात.असं सांगतात की,राम रहिम याच्यावर एका पत्रकाराच्या खुनाचाही आरोप आहे.त्यानं राम रहिम यांच्या विरोधात काही स्फोटक बातम्या दिल्या होत्या.आसाराम बापूच्या प्रकरणातही असंच दिसून आलं आहे.मिडियानं बुवाबाजीच्या विरोधात सातत्यानं आक्रमकपणे बातम्या चालविलेल्या आहेत.त्यातून त्यांच्या भक्तांमध्येही मिडियाबद्दल सुप्त संताप असतो.यातून अशा घटना घडत असतात.अर्थात अशा हल्ल्यांनी मिडिया गप्प बसण्याची सुतरामही शक्यता नाही.मिडियाचा आवाज बंद करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणूनही अशा घटनांकंडं पाहता येईल मात्र यातून मिडियाविरोधकांच्या हाती काहीच लागणार नाही.कोणाला आवडो ना आवडो मिडिया आपलं काम चालूच ठेवणार आहे.–