माहिती खात्याकडून सुरूय ज्येष्ठ पत्रकारांची अडवणूक

0
2527

पत्रकार सन्मान योजनेचे अर्ज मंजूर करताना

वयोवृद्ध पत्रकारांची अडवणूक आणि छळवणूक


तोंडं पाहून अर्ज मंजूर केले जात

असल्याचा एस.एम.देशमुख यांचा आरोप


मुंबई दि. 10: पत्रकार सन्मान योजनेचा अर्ज मंजूर करताना ज्येष्ठ पत्रकारांची प्रचंड अडवणूक आणि पिळवणूक होत असल्याने “भीक नको पण कुत्रे” आवर असं म्हणण्याची वेळ राज्यातील अनेक वयोवृद्ध आणि ज्येष्ठ पत्रकारांवर आली आहे..ज्यांनी आयुषभर निष्ठेने पत्रकारिता केली, पत्रकारितेशिवाय अन्य काहीच केले नाही अशा ज्येष्ठांचे अर्ज तांत्रिक मुद्दे उपस्थित करून नाकारले जात आहेत.. पेन्शन देण्याऐवजी ती दिली कशी जाणार नाही, पत्रकार खेटा कश्या मारतील याचाच प्रयत्न अधिकारी वर्गाकडून होत असल्याने राज्यभर पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे.. सत्तरी – पंच्याहत्तरी ओलांडलेल्या पत्रकारांची होणारी अडवणूक संतापजनक आणि निषेधार्ह असल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले असून हा सारा विषय मुख्यमंत्री आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.. मराठी पत्रकार परिषदेने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सलग 22 वर्ष लढा दिल्यानंतर राज्यात ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना सुरू झाली..तेव्हा राज्यातील पत्रकारांनी आनंदोत्सव साजरा केला.. पण ही योजना फसवी असल्याचे आता दिसून येत आहे.. अशी काही नावं आहेत की, ज्यांचे अनेक “उद्योग” आहेत , शिक्षण संस्था आणि अन्य व्यवसाय आहेत ते सन्मान योजनेचे लाभार्थी ठरले आहेत मात्र ज्यांनी आयुष्यभर पत्रकारिता एके पत्रकारिता केली त्यांना पेन्शन नाकारली गेली आहे.. अशा नावडत्या पत्रकारांची संख्या मोठी असली तरी येथे दोन तीन उदाहरणे देता येतील.. .. धुळ्याचे गोपी लांडगे हे 75 वर्षांचे पत्रकार आहेत.. गेली 50 वर्षे पत्रकारितेत आहेत.. 33 वर्षांपासून त्यांचे स्वतःचे “एकला चलो रे” हे साप्ताहिक अखंडपणे सुरू आहे.. गेली 27 वर्षे त्यांच्याकडे अधिस्वीकृती आहे, ते ३ वर्षे अधिस्वीकृती समितीचे सदस्य देखील होते.. असं असतानाही “तुमच्याकडे 30 वर्षांचा अनुभव नाही आणि तुम्ही केवळ पत्रकारिताच केली हे दिसत नाही” असे कारण सांगत लांडगे यांचा अर्ज नाकारला गेला आहे..एकदा नव्हे दोनदा नाकारला गेला आहे.. “माझा कोणताही व्यवसाय नव्हता, मी फक्त आणि फक्त पत्रकारिताच केली हे ओरडून तर सांगितलंच पण तसं लेखी प़तिज्ञापत्र लांडगे यांनी सादर केलं पण कोणी त्याची दखल घेतली नाही.. .. जी कागदपत्रे हवीत ती सारी दिली आहेत तरीही त्यांची अडवणूक आणि मानसिक छळ केला जात आहे.. यापुर्वी देखील त्यांचा अर्ज यासाठी नाकारला गेला की, संपादक म्हणून त्यांचे अंकावर नाव आहे.. त्यांनी नवे डिकलेरेशन करून पुन्हा अर्ज केला तर आता 30 वर्षांचा अनुभव नाही असे कारण दिले जात आहे हे संतापजनक आणि निषेधार्ह असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे..दुसरे उदाहरण रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पत्रकार नवीन सोष्टे यांचे आहे.. ७० वर्षांचे आणि अनेक व्याधींनी त्रस्त असलेल्या या पत्रकाराचा अर्ज “तुम्हाला 30 वर्षांचा अनुभव नाही” या कारणांसाठी नाकारला गेला.. वस्तुतः नवीन सोष्टे गेली 40 वर्ष पत्रकारितेत आहेत.. 1989 मध्ये अंबा नदीला आलेल्या पुरानं सोष्टे यांचंचं घर नव्हे तर सारे नागोठणे वाहून गेले.. त्यात सोष्टे यांची कागदपत्रे देखील वाहून गेली.. यावर” अांबा काठचे अश्रू” नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे..अन्य 16 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. एक चांगला पत्रकार, साहित्यिक म्हणून कोकणात त्यांची ओळख आहे.. स्वतः महासंचालक दिलीप पांढरपट्टे देखील त्यांना ओळखतात.. गंमत म्हणजे “तुमचा अर्ज मंजूर झाला असल्याचे सांगत” माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सोष्टे यांचे अभिनंदनही केले होते.. मात्र विभागाकडून जे पत्र आले त्यामध्ये तुमचा अनुभव नसल्याने तुमचा अर्ज नाकारण्यात येत असल्याचे कळवले गेले आहे..या सारया गोंधळाने नवीन सोष्टे हतबल झाले असून आयुष्यभर दुसरयावरच्या अन्यायाविरोधात लढणारा हा पत्रकार आज स्वतःच व्यवस्थेच्या गलथानपणाचा शिकार बनला आहे.. तिसरे उदाहरण जळगावचे अरूण मोरे यांचे.. त्यांचे प्रतिशाली नावाचे नियतकालिक आहे.. 26 जानेवारी 1983 पासून हे साप्ताहिक नियमित चालविले जात आहे.. हे 70 वर्षांचे पत्रकार आहेत.. त्यांचाही अन्य कोणताही व्यवसाय नाही असे असतानाही “तुम्हाला अनुभव नाही” या कारणावरून त्यांचा अर्ज नाकारला गेला आहे.. धुळे जिल्हयातून आठ ज्येष्ठांनी अर्ज केले होते त्यापैकी एकही अर्ज मंजूर झालेला नाही..शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचा जो ट़सट आहे तो सध्या अस्तित्वात नाही.. त्यामुळे अधिकारीच हे काम पाहतात.. त्यातून सर्वसामांन्य आणि विशेषत्वाने ग्रामीण पत्रकारांची मोठी अडवणूक केली जात आहे.. या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे यांची भेट लवकरच भेट घेऊन गार्‍हाणं मांडले जाणार असल्याची माहिती विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी दिली आहे…तोंडं पाहून सन्मान योजनेचे अर्ज मंजूर केले जात असून ज्यांनी आयुष्यभर तोंडी लावणयापुरती पत्रकारिता केली अशा अनेकांना पेन्शन सुरू झाली असून फक्त पत्रकारिता करणारे मात्र वंचित राहिले आहेत.. सरकारने ज्येष्ठ पत्रकारांची नाहक अडवणूक थांबविली नाही तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन राज्यभर काळा दिन म्हणून पाळला जाईल असा इशाराही एस.एम.देशमुख यांनी दिला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here