माहिती आणि जनसंपर्क विभाग कात टाकतोय…

डीजीआयपीआर म्हणजेच माहिती आणि जनसंपर्क हा सरकारचा महत्वाचा विभाग मानला जातो.तो मुख्यमंत्री जाणीवपूर्वक स्वतःकडे ठेवतात.देवेंद्र फडणवीस यांच्याकाळातही हा विभाग त्यांच्या अखत्यारित होता.मात्र मुख्यमंत्री या विभागाकडं लक्ष देऊ शकले नाहीत.पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून या विभागाला स्वतंत्र कॅबिनेट मंत्री द्यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.शिवाय महासंचालक हा आयएएस अधिकारी असावा आणि महासंचालक आणि विभागाचा सचिव वेगवेगळे असावेत अशी देखील परिषदेची मागणी आहे.

मागील सरकारात या विभागाला राज्यमंत्री देखील नसल्यानं या विभागाची अवस्था बेवारस अशी झाली होती.महासंचालक ब्रिजेशसिंग हे आयपीएस अधिकारी.महासंचालकपद आणि सचिवपद अशी दोन्ही पदं ब्रिजेशसिंग यांच्याकडं होती.माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या महासंचालकपदी एका पोलीस अधिकार्‍यास आणण्याचा क्रांतीकारी ( ?) निर्णय मागील सरकारनं घेतला होता.माहिती आणि जनसंपर्कमध्ये त्यानंतर पोलीस राज सुरू झाले.पत्रकारांची चळवळ मोडून काढण्याचा शक्य तेवढा प्रयत्न या काळात झाला.चळवळीचं नेतृत्व कऱणार्‍या पत्रकारांवर पोलिसांची नजर ठेवण्याचाही उद्योग झाला.ब्रिेजशसिंग हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले अधिकारी असले तरी ते वगळता  सीएमओ ऑफिसमधून या विभागाची आणि त्यातील अधिकार्‍यांची प्रचंड उपेक्षा झाली..संचालकांना देखील सीएमओमध्ये प्रवेश नसायचा..संचालक मुख्यमंत्र्यांना किती वेळा भेटले असतील सांगता येत नाही.सीएमओमधील उसणवारीवर आणलेली मंडळीच माहिती आणि जनसंपर्कला आदेश द्यायची.या अधिकार्‍यांना कामही उरले नव्हते.त्यांच्यातील कार्यक्षमता आणि  कल्पकता पूर्णपणे संपवून टाकण्याचा कार्यक्रम राबविला गेला .एका संचालकांना केवळ सीएमच्या रोजच्या कार्यक्रमाची प्रेसनोट काढण्याचेच काम उरले होते.एखादया पत्रकारांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर माहिती आणि जनसंपर्क विभाग त्यासाठी काहीच करू शकत नव्हता.अतंर्गत राजकारणानं हा विभाग पोखरून गेला होता.सीएमओमधून त्यात तेल ओतण्याचं काम व्हायचं.या सर्वामुळं चांगल्या ,प्रामाणिक अधिकर्‍यांचं खच्चीकरण झालं होतं.प्रश्‍न विचारणाऱ्या  किंवा नियमांची  भाषा करणाऱ्या  अधिकार्‍यांच्या दूरवर बदल्या व्हायच्या आणि मर्जीतले अधिकारी निवृत्तीनंतरही महत्वाच्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते.या सार्‍यामुळं या विभागात नैराश्य पसरलं होतं आणि अधिकार्‍यांमध्ये उदासिनता आली होती.कोण कोणाशी बोलतंय ? कोण येतंय ?कोणाला भेटतंय ? यावर वॉच असायचा.त्यामुळं पत्रकारांशी बोलायलाही अधिकारी घाबरायचे..विभागातील अशा कोंदट वातावरणाचा परिणाम असा झाला होता की,विभागातील पत्रकारांचा राबता ही कमी झाला होता.विभागाचा पत्रकारांशीही संपर्क राहिला नव्हता.जनतेपासून तर या विभागानं फारकतच घेतली होती.केवळ नावापुरता हा विभाग जनसंपर्क विभाग राहिला होता..

मात्र आता सरकार बदलंलंलय,माहिती आणि जनसंपर्कमध्ये टप्प्याटप्यानं बदल होईल असं दिसतंय..कोल्हापूर विभागाचे उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे आता मुख्यमंत्र्यांकडं रूजू झाले आहेत.किरण मोघे हे मातोश्रीवर असतील.सीएमओतील उसणवारी अधिकार्‍यांचं राज्य संपलं याचं माहिती आणि जनसंपर्कमध्ये स्वागत होत आहे.आम्ही देखील या बदलाचे स्वागत करीत आहोत.मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅपॉईनमेंट आणि अन्य कामं आता अष्टपुत्रे पाहतील अशी शक्यता आहे.या बदलामुळे पत्रकार आणि मुख्यमंत्री यांच्यात संवादाच नवा पूल बांधला जाऊ शकतो.माहिती आणि जनसंपर्क विभागातील आणखी दोन तीन अधिकारी सीएमओमध्ये जाणार असल्याची बातमी आहे.माहिती आणि जनसंपर्कची प्रतिष्ठा पुन्हा मिळणार असेल तर याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे.हा बदल म्हणजे एक प्रकारे या विभागाच्या पुनर्रजन्माची सुरूवात आहे.या विभागात गटबाजी कऱणारे,पत्रकार संघटनांमध्ये राजकारण करणारया अधिकर्‍यांचे मात्र या बदलामुळे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here