पत्रकारांवरील हल्ल्याच्या किंवा धमक्याच्या काल राज्यात दोन घटना घडल्याचे समोर आले आहे.पहिली घटना आहे पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील कामशेत येथील.तेथे बंटी वाळुंज या मनसे तालुका अध्यक्षाची हत्त्या झाल्यानंतर त्याचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला करण्यात आला.त्यात पाच पत्रकार जखमी झाले असून एका महिला पत्रकारांचाही त्यात समावेश आहे.जखमी झालेल्यांमध्ये जय महाराष्ट्रचे गणेश दुडम आणि टीव्ही-9च्या चैत्राली राजापूरकर यांचा समावेश आहे.दुडम यांचा टी शर्ट फाडण्यात आला,तसेच त्यांच्याकडील कॅमरेही हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला.यावेळी पोलिस उपस्थित असतानाही जमावाला आवरण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला नाही.मारहाण पोलिसासमोर झाली.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
दुसरी घटना रत्नागिरी येथील.येथील झी-24 तासचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांना यांना येथील एका खासगी कंपनीच्या केबल टाकणार्या व्यक्तीने अर्वाच्च शिविगाळ करून जिवेमारण्याची धमकी दिलीआहे.रत्नागिरीचे पत्रकार आज पोलिस अधीक्षक डॉ.संजय शिंदे यांची भेट घेत आहेत. दोन्ही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे.