*माध्यम समुहांनी आपल्या पत्रकारांना विमा कवच द्यावे: एस एम देशमुख*

मुंबई :कोविड मुळं पत्रकारांचे जाणारे बळी आणि त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत विचारात घेऊन सर्व वाहिन्या आणि दैनिकांनी पूर्णवेळ पत्रकार आणि पार्ट टाइम वार्ताहरांचा तातडीने विमा उतरावा असे आवाहन  मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील सर्व माध्यम समुहांना केले आहे..
महाराष्ट्रात एकटया एप़िल महिन्यात महणजे 22 दिवसात कोरोनानं तब्बल 33 पत्रकारांचे बळी घेतले आहेत.. ऑगस्ट 2020 ते 17 एप्रिल 2021 या कालावधीत 105 पत्रकारांचे बळी गेले आहेत.. 2000 पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले आहेत.. अनेक पत्रकारांकडे उपचारासाठी पैसे नाहीत आणि ज्या पत्रकारांचे निधन झाले आहे त्यांची कुटुंबं रस्त्यावर आली आहेत.. कारण दुसरया लाटेत जे पत्रकार बळी गेले आहेत, त्यातील बहुसंख्य पत्रकार 35 ते 50 वयोगटातील होते.. कुटुंबाची जबाबदारी अंगावर असतानाच घरचा कर्ता पुरूषच गेल्याने कुटुंबंच उद्ध्वस्त झाली आहेत.. दुर्दैवानं एकाही माध्यम समुहानं मृत पत्रकारांच्या कुटुंबाला कसलीही मदत केली नाही.. हे वास्तव आहे.. इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी किमान आपल्या पत्रकारांचा विमा उतरावा असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे..
केंद्राच्या धर्तीवर राज्याने देखील मृत पत्रकाराच्या नातेवाईकांना 5 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.. त्यासाठी मेल पाठवा आंदोलन देखील केले.. मात्र प्रचंड गोंधळलेल्या सरकारने या मागणीची दखल घेतली नाही.. सरकार काहीच करीत नसेल तर ज्या माध्यमांसाठी पत्रकार काम करतात त्यांनी तरी आपल्या पत्रकारांची काळजी घेत त्यांना विमा कवच द्यावे. आणि पत्रकार अधिक निर्धाराने काम करतील असे वातावरण तयार करावे असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे..
या संदर्भात प्रमुख माध्यम समुहांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रं पाठविण्यात..येणार असल्याचेही एस. एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी स्पष्ट केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here