व्हर्च्युअल अँकर
पुरूष किंवा महिला टीव्हीवर बातम्या वाचताहेत हे चित्र आता इतिहास जमा होणार असं दिसतंय..ही जागा लवकरच तंत्रज्ञानाने विकसित केलेला वृत्तनिवेदक घेणार आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेला हा वृत्तनिवेदक येतोय या बातमीनं सारं जग आश्चर्यचकित झालं.चीननं ही किमया साधलीय.चीननं यापुर्वी हुबेहुब मानवासारख्या दिसणार्या यंत्रमानवाची निर्मिती करून जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता.छोटया मुलांसोबत खेळणारा यंत्रमानवही चीननं नुकताच विकसित केला .चीन आता कृत्रिम चंद्राची निर्मिती करीत असल्याची घोषणाही काही दिवसांपुर्वीच केली गेली.आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेला वृत्तनिवेदक तयार केला गेला आहे.बातम्या वाचणारा हा नवा अँकर जराही न थकता,न कंटाळता रोजच दिवसभर बातम्या वाचणार आहे.अन हो तो जराही आर्टिफिशल वाटणार नाही.हुबेहुब खराखुरा वाटेल.आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या तंत्रज्ञानावर तो काम करणार आहे.शिवाय तो चीनमधील कोणत्याही शहरातून आणि कोणत्याही ठिकाणावरून अँकरींग करू शकेल.क्यू हो असं या नव्या अँकरचं नाव आहे.क्यू हो चीनमधील शिन्हुआ या सरकारी न्यूज चॅनलच्या न्यूजरूमध्ये आज दाखल झाला..हा व्हर्च्युअल अँकर रोबोट नाही.किंवा मानवाचे 3 डी मॉडेलही नाही.हा अँकर म्हणजे माणसासारखा दिसणारा एक अॅनिमेशन आहे.
शिन्हुआ या वाहिनीने आज आपल्या ट्टिटर हँडलवरून याबाबतचा दोन मिनिटाचा एक व्हिडिओ अपलोड केला. ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी या अँकरचा चांगला उपयोग होईल असं या वाहिनीचं म्हणणं आहे.अँकरचा आवाज,शब्दफेक,ओठांची हालचाल,चेहर्यावरील हावभाव एखाद्या व्यावसायीक अँकर सारखेच असतील.व्हर्च्युअल अँकर निर्माण करण्यात सोगो या चीनी सर्च इंजिनीची भूमिका महत्वाची आहे..