राज्यातील शेतकर्यांची दयनीय अवस्था,त्यांच्या आत्महत्या आणि संपाच्या निमित्तानं त्यांच्या सहनशिलतेचा झालेला कडेलोट आदिंमुळे मराठी वाहिन्या तसेच मराठी वृत्तपत्रांनी शेतकरी हिताची भूमिका घेत या संपाचं चांगलं कव्हरेज दिलं. आणि समाजमनात माध्यमं शेतकर्यांचे प्रश्न मांडत नाहीत हा समज चुकीचा ठरविला.अनेक वाहिन्यांचे संपादक स्वतः घटनास्थळांवर जाऊन रिपोर्टिंग करताना,किंवा थेट लाइव्ह करताना दिसत होते.या सर्वाचा परिणाम संपाची दाहकता सर्वत्र दिसून आली.सरकारला तातडीने संपाची दखल घ्यावी लागली.काही नालायक शेतकऱी नेत्यांमुळं संप फोडण्यात सरकार यशस्वी झालं तरी माध्यमं शेतकर्यांबरोबर आहेत हा संदेश यातून नक्कीच गेला.
मात्र या संपामुळं ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले अशा शक्ती आता संप चिघळल्याचं खापर माध्यमांवर फोडू लागले आहेत.पुण्यात आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर हलिमा कुरेशी आणि व्हिडीओ जर्नालिस्ट निखिल करंदीकर यांना काही हितसंबंधी समाजकंटकांनी धक्काबुक्की केली.संपानंतर बाजारपेठेतली स्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी हे पत्रकार बाजारात गेले होते.त्यावेळी आता व्यापारी आणि शेतकर्यांची भूमिका काय हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता माध्यमांमुळे संप चिघळल्याचा आरोप करून काही समाजकंटकांनी त्यांना धक्काबुक्की केली.या घटनेचा त्रिवार धिक्कार.महाराष्ट्रातील माध्यमं यापुढंही शेतकर्यांबरोबरच असणार आहेत.कारण माध्यमातील बहुतेक तरूण मुलं ही शेतकर्यांची पोरं असून त्यांची दुःख,वेदना त्यांनी अनुभवलेल्या आहेत.-