पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया ही देशातील जनसंपर्क अधिकाऱ्यांची संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावर परिषदा आयोजित करणे, विविध विषयावर चर्चा घडवून आणणे, याबाबत ही सोसायटी कार्य करते. नागपूर शाखेतर्फे मागील वर्षी 33 वी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. याशिवाय गेल्या तीन वर्षापासून 21 एप्रिल या जनसंपर्क दिनी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. अनिल ठाकरे यांना या वर्षीचा ‘उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. माहिती खात्यातील अधिकाऱ्याला बहुधा पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला. या निमित्ताने श्री. अनिल ठाकरे यांची नेटभेट मध्ये झालेली बातचीत….
प्रश्न-1 : आपला जन्म, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले ?
माझा जन्म 22 सप्टेंबर 1958 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या गावी झाला. माझे महाविद्यालयीन शिक्षण बाबा आमटे यांनी सुरु केलेल्या आनंद निकेतन महाविद्यालयात झाले.
प्रश्न-2 : आपण प्रसार माध्यमात कधी आलात ?
एका साप्ताहिकाचा संपादक म्हणून माझ्या पत्रकारितेची कारकीर्द सुरु झाली. बाबांच्या आनंदवनातील छापखान्यात आम्ही ‘कुजबुज’ हे साप्ताहिक छापत होतो. 1977 मध्ये हे साप्ताहिक सुरु केले. या आधी जिल्हा स्तरावरील दैनिक महाविदर्भ व इतर छोट्या वृत्तपत्रात लिखाण करीत होतो. माहिती खात्यात 19 नोव्हेंबर 1982 रोजी माहिती सहाय्यक या पदावर रुजू झालो. तब्बल 24 वर्ष मी माहिती सहाय्यक होतो. त्यानंतर 2006 मध्ये माहिती अधिकारी व 2013 मध्ये जिल्हा माहिती अधिकारी झालो.
प्रश्न-3 : आतापर्यंत माहिती खात्यातील अविस्मरणीय प्रसंग कोणता ?
प्रसंग तसे अनेक आहेत. पण 2012 मध्ये नवी दिल्लीहून आलेल्या पत्रकारांना हेमलकसा येथे श्री.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात घेऊन जाण्याचा प्रसंग ठळकपणे आठवतो. नागपूरहून बसमधून हेमलकसा येथे पत्रकारांना सुरक्षित घेऊन जाणे व आणने यासाठी समन्वयक म्हणून माझ्यावर काम सोपविण्यात आले होते. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रातील तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक संचालक प्रविण टाके यांच्या सोबत हा दौरा केला. तो निर्विघ्नपणे पार पडला. कारण या भागात त्या दरम्यान काही अनुचित घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांचा दौरा करणे खरेच जिकीरीचे होते. पण त्यावेळचे गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र गोटा आणि आम्ही हा दौरा यशस्वी केला.
प्रश्न-4 : माहिती खात्याबद्दलच नव्हे तर सर्वच प्रकारच्या शासकीय प्रसार माध्यमांबद्दल काय सांगाल?
माहिती खाते सर्व माध्यमाशी संबंधित खाते आहे. छोट्या वृत्तपत्रांपासून मोठ्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या संपादक, वार्ताहरांशी सतत संबंध येतो. यात आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, क्षेत्रीय प्रचार अधिकारी, एफएम, पारंपरिक प्रचाराची साधने, योजनांचा प्रचार करतांना उपयोग होतो.
यावेळच्या विशेष प्रसिद्धी मोहिमेसाठी नागपूर जिल्ह्यात एल.ई.डी. व्हॅनचा उपयोग करण्यात आला. याशिवाय पथनाट्य, एफएमवर जिंगल्सचा प्रभावी उपयोग झाला.
लोकराज्य मासिकामुळे या खात्याला खेड्यापाड्यात ओळखतात. शिक्षक, ग्रामसेवक, महिला बचतगट, विद्यार्थी लोकराज्याचा आवर्जून उल्लेख करतात. याशिवाय प्रत्येक जिल्हा परिषद गटातील एका गावात समाधान शिबिरांना व्यापक प्रसिद्धी देणे, तेथे पत्रकारांना सोबत घेऊन जाणे यामुळे शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही कामावरच असतो. अहर्निश सेवा !
प्रश्न-5 : नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांपेक्षा आपल्या कामाच्या स्वरुपात काय फरक आहे ?
नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे अति महत्वाच्या व्यक्तींचा सतत वावर असतो. नागपुरात दीक्षाभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. सोबत नागपुरच्या चारही दिशांना दीडशे किलोमीटर अंतरावर अभयारण्ये आहेत. देशातील हे दुर्मिळ चित्र आहे. नागपुरातून बाहेर पडल्याबरोबर जंगलाला सुरुवात होते. त्यामुळे नागपुरला टायगर कॅपिटल म्हणतात. मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस नागपुरातील असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कितीही कार्यक्रम असले तरी टीमवर्क म्हणून माहिती संचालकांपासून सर्वजण एकदिलाने काम करतात. त्यामुळे कामाचा ताण येत नाही. माहिती खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कामाची पद्धत आणि वेळा माहिती झाल्यामुळे तणावाचे प्रसंग येत नाही.
प्रश्न-6 : दैनंदिन कामाशिवाय आपण काय वैशिष्ट्यपूर्ण काम केले ? ज्यामुळे आपणास उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला ?
दैनंदिन कामकाज सांभाळून मी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, पत्रकारिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, सर्वांच्या सहकार्याने ग्रंथोत्सव आयोजित करणे, छोटी वृत्तपत्रे व मोठी दैनिके त्यात काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम प्रभावीपणे केले. हे काम थोडे जिकिरीचे आहे पण सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा आहे. आपल्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे शक्य तेवढे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पत्रकार साहित्यिक, समाजसेवक, स्वयंसेवी संस्थाशी वैयक्तिक स्तरावर सौजन्याचे, सहकार्याचे संबंध प्रस्तापित केले. शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत थेट पोहचण्यासाठी चित्ररथ योजना राबविली. लोकराज्य मासिकाची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली. अधिवेशन काळात सुरु केलेल्या अभिनव दूरदर्शन वार्तापत्रात योगदान दिले. या सर्व कामांची जाणीव असल्यामुळेच पब्लिक रिलेशन्स सोसायटीने उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून माझी निवड केली असावी, असे मला वाटते.
प्रश्न-7 : आपल्या कौटुंबिक परिस्थितीविषयी सांगा ?
घरी माझी पत्नी व एक मुलगी आहे. पत्नी महसूल खात्यात नोकरी करते. त्यामुळे माहिती खात्यातील कामाची तिला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे घरुन मला पत्नीचे पूर्ण सहकार्य मिळते. परंतु काही ठिकाणी नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्यास त्या ठिकाणी व्यस्ततेमुळे दोघेही एकत्रित उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे त्यांची काही वेळा नाराजी होते.
प्रश्न-8 : शासकीय माध्यमात नव्याने येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
जागतिकीकरणामुळे शासन, प्रशासन, जनतेला विविध सेवा देणाऱ्या संस्था जनसंपर्क अधिकाऱ्याच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधतात. प्रचार व प्रसाराची माध्यमेसुद्धा बदलली आहे. अशावेळी शासनाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून सामान्य जनतेशी संपर्क साधताना ग्रामीण व शहरी भागात असलेल्या माध्यमांचा आपल्याला उपयोग करावा लागेल. वयाचे अंतर असणाऱ्या नव्या व जुन्या अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. एखाद्या विषयात केवळ सखोल ज्ञान असून चालणार नाही, तर प्रत्यक्ष ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांच्याशी थेट संवाद साधणे गरजेचे आहे. अशावेळी माझ्या नवीन सहकाऱ्यांना हेच सांगू इच्छितो की, समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, स्वयंसेवी संघटना, विविध विषयांवर काम करणारे नागरिक यांच्याशी आपला संपर्क असणे गरजेचे आहे. निदान आपल्या माहिती खात्यातील अधिकाऱ्यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी अशा लोकांशी संपर्क ठेवण्याची आवश्यकता आहे. माहिती खात्यात काम करणारा प्रत्येक कर्मचारी तो कोणत्याही पदावर असो, तो आपला जनसंपर्क अधिकारीच असतो. विदर्भात शिपायापासून वाहनचालकापर्यंत सर्वांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्या चुटकीसरशी सोडविल्याचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. त्यामुळे माहिती खात्यातील प्रत्येक कर्मचारी हा महत्वाचा ठरतो.
श्री. अनिल ठाकरे यांनी नवीन अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या जवळपास 40 वर्षांच्या अनुभवातून केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे.
श्री. ठाकरे यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
-देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती)(प्रशासन)