माथेरान रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी आता अमन लॉज ते माथेरान दरम्यान संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.तीन किलो मिटर लांबीची ही भिंत रेल्वे मार्ग आणि दरीच्या दरम्यान बांधली जाणार असून त्यासाठी तीन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.हे काम पूर्ण होण्यासाठी पाच महिन्याचा कालावधी लागणार असल्याने माथेरानकरांना पावसाळा संपेपर्यंत मिनिट्रेनची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मे महिन्यात लागोपोठ दोन वेळा टॉय ट्रेनला अपघात झाल्यानंतर ही रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र स्थानिकांनी दबाव वाढविल्यानंतर अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू कऱण्याचा निर्णय रेल्वे घेतला होता.त्यासाठी दोन वेळा चाचणी देखील झाली.प्रत्यक्षात रेल्वे सुरूच झाली नाही.आता संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय झाल्याने पावसाळ्यानंतर का होईना माथेरानची रेल्वे सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.