संपादकांची नियुक्ती गुणवत्तेनुसार होतेच असं नाही,किंबहुना या नियुक्तयाही आता राजकीय झाल्या आहेत.विशषतः संत्ताधारी पक्षाची मर्जी राखण्यासाठी ते सूचवतील ते संपादक घेतले जातात किंवा त्यांना नको असलेल्या संपादकांना घरी पाठविले जाते.अलिकडच्या काळात अशा घटना मोठया प्रमाणात वाढल्या आहेत.राजकीय हस्तक्षेपामुळे नोकरी घालवावी लागलेल्या संपादकांची संख्या मोठी आहे.आणखी वरिष्ठ पत्रकार लवकरच आपली नोकरी गमवून बसतील अशी शक्यता इतरांनी नव्हे स्वतः त्यांनीच पतप्रधानांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.हे पत्रकार मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात,माझी नोकरी खरंच जाणार का सर,..मिडिया ठराविक भांडवलदारांच्या हातात देण्याची गती आता कित्येक पटीने वाढली असून तटस्थ भूमिका घेणार्या संपादकांना किंवा पत्रकारांना बुरे दिन आले आहेत.निःपक्ष किंवा तटस्थ असलेले अनेक संपादक अधांतरी लटकत आहेत.त्याना जॉब मिळत नाही असे चित्र आहे.
एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फेसबुकवरुन खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी पंतप्रधानांना काही झोंबणारे प्रश्न विचारले आहेत. सोशल मीडियावर भाजप समर्थकांकडून ओलांडली जाणारी सभ्यतेची मर्यादा, एनडीटीव्ही समूह विकला जाणार असल्याच्या चर्चा यावर रवीश कुमार यांनी पत्रातून भाष्य केले आहे.
‘सध्या सोशल मीडियावर विरोध करताना सभ्यतेच्या किमान मर्यादांचे उल्लंघन केले जात आहे. अशा लोकांमध्ये भाजप समर्थकांसह, उजव्या विचारांच्या संघटनाचे समर्थक आणि त्यांना विरोध करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. मात्र मर्यादा सोडणाऱ्या लोकांपैकी काहींना तुम्ही ट्विटरवर फॉलो करता, हे सर्वात दु:खद आहे,’ अशा शब्दांमध्ये रवीश कुमार यांनी मोदींवर टीका केली. ‘अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टीका करणाऱ्या, पातळी सोडणाऱ्या लोकांना तुम्ही ट्विटरवर फॉलो करता. सार्वजनिकरित्या या गोष्टींची चर्चा झाल्यावरही तुमच्या भूमिकेत कोणताही बदल होत नाही. हे तुम्हाला आणि तुमच्या पदाला शोभून दिसत नाही,’ असेही रवीश यांनी म्हटले आहे.
‘काही खास योग्यता असल्यामुळेच तुम्ही एखाद्या व्यक्तीला फॉलो करत असाल. धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि जातीयवादी विचार मांडणे, या सगळ्या गोष्टींना तुम्ही योग्यता समजत नसाल, अशी पूर्ण आशा मला आहे,’ असा टोला त्यांनी मोदींना लगावला. ‘मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही खरेच नीरज दवे आणि निखिल दधीचला फॉलो करता का? तुम्ही त्यांना फॉलो का करता?’, असे सवाल रवीश यांनी विचारले आहेत.
मोदींना लिहिलेल्या खुल्या पत्रात रवीश कुमार यांनी एनडीटीव्ही समूह विकला जाणार असल्याच्या चर्चेचाही उल्लेख केला आहे. ‘मी एक सामान्य नागरिक आणि सजग पत्रकार आहे. तुमच्या कृपेमुळे लवकरच मी रस्त्यावर येणार आहे. माझी नोकरी जाणार आहे, म्हणून सोशल मीडियावर काही दिवसांपासून आनंद व्यक्त केला जातो आहे. सरकार माझ्या मागे लागले असल्याचे काहींनी म्हटले आहे,’ असे म्हणत रवीश यांनी मोदींवर निशाणा साधला.‘काही दिवसांपूर्वीच हिंदुस्तान टाईम्सचे संपादक बॉबी घोष यांना तुमच्या नाराजीमुळे नारळ देण्यात आल्याची बातमी ‘द वायर’वर वाचली. त्यानंतर आता माझा नंबर असल्याचे अनेकजण म्हणतात. हे सर्व वाचून हसू येते, मात्र चिंताही वाटते. भारताचा एक सामर्थ्यवान पंतप्रधान एका पत्रकाराला नोकरीवरुन काढू शकतो, यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही,’ अशा तिरकस शब्दांमध्ये त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. ‘लोक म्हणतात, आता तुमचे थोडेच दिवस उरलेत. तुमचाही बंदोबस्त केला जाईल. खरेच असे काही होईल का?,’ असा सवाल त्यांनी मोदींना विचारला आहे.
लोकसत्तावरून साभार