मुंबई ते मांडवादरम्यान रो रो सेवा मार्गी लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मांडवा येथे ब्रेक वॉटर बंधारा उभारणे आणि रो रो सेवा सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. यानंतर आता अलिबागला मुंबईशी जोडण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने यासाठी तब्बल १३० कोटी रुपये खर्चाच्या कामांची जागतिक निविदा प्रसिद्ध केली आहे.
पावसाळ्यात जलवाहतूक सुरक्षित होण्यासाठी मांडवा बंदर येथे प्रवासी बोटींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्रेक वॉटरचे बांधकाम करावे, अशी आग्रही मागणी माजी आमदार दत्ताजीराव खानविलकर यांनी दोन दशकांपूर्वी केली होती. मात्र त्या वेळी या मागणीचा गांभीर्याने विचार झाला नव्हता.
आता मात्र मुंबईला बारमाही जोडण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार सकारात्मक आहे. शासनाने मुंबई ते मांडवा या बारमाही वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. इतकेच नव्हे तर मेरिटाइम बोर्डाने मांडवा येथे ब्रेक वॉटर बांधकाम व रो रो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पूरक कामांसाठीची निविदा काढली आहे.
मांडवा बंदरावर पावसाळ्यात प्रवासी बोटी थांबविणे समुद्राच्या प्रवाहामुळे शक्य होत नाही. लाटांचा प्रवाह कमी करण्यासाठी समुद्रात काही अंतरापर्यंत बांधकाम करून बंदरानजीकचे पाणी संथ करण्यासाठी ब्रेक वॉटरचे बांधकाम केले जाणार आहे. तर रो रो सेवेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांच्या कामांसाठीही मेरिटाइम बोर्डाने निविदा मागवली आहे. या दोन्ही कामांसाठी तब्बल १३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर हे काम कंत्राटदाराने केवळ १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करायचे असल्याचा उल्लेख बोर्डाच्या निविदेत आहे. ब्रेक वॉटरमुळे बारमाही जलवाहतुकीचा मार्ग मोकळा होणार असून रो रो सेवेमुळे मुंबई येथे मालवाहतूक, पर्यटन या क्षेत्रांचाही विकास होणार आहे. ब्रेक वॉटरचा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर अतिवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला तरच फक्त ही सेवा बंद राहू शकते. अन्यथा मुंबई ते मांडवा ही बोट सेवा बारमाही होईल. यात छोटय़ा खासगी बोटींना मरिनाच्या साहाय्याने पाìकग करण्याची सोय उपलब्ध असेल. सध्या मुंबईत गेटवेच्या परिसरात समुद्रात पार्क केल्या जाणाऱ्या या खासगी बोटी यापुढे सुरक्षिततेच्या कारणास्तव मांडवा येथे पार्क करण्यासाठी सरकार सक्तीचे करू शकेल.
डी. जी. शििपग व आय.आर.एस. यांच्या वतीने याबाबत जागतिक पातळीवरील सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मांडवा येथे बोटी पार्क झाल्याने जवळपास एक हजार ते दीड हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. येथे सर्व बोटींना पाणी, पेट्रोल-डिझेल भरण्याची सोय, स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी अत्याधुनिक निवारा शेड या सुविधा पुरविल्या जातील.
मांडवा येथे ब्रेक वॉटर बंधारा बांधावा, माजी बंदर राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनीही प्रयत्न केले होते. मात्र निधीअभावी हे काम रखडले होते.
केंद्रीय मंत्रिमंडळात रस्ते व बंदर खाते सांभाळत असलेल्या नितीन गडकरी यांनी या दोन्ही प्रकल्पांना आता मान्यता दिली आहे. डी.जी.शििपग, केंद्रीय बंदर अधिकारी, राष्ट्रीय सागरमालाचे अधिकारी, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एकत्रित बठक आयोजित करून आता निविदा काढण्यात आली आहे.
दरम्यान, हा प्रकल्प उभारला जात असताना सासवने, मांडवा येथील मच्छीमारांचे धक्के अबाधित ठेवण्याची मागणी आमदार जयंत पाटील यांनी मेरिटाइम बोर्ड व केंद्रीय बंदर खात्याकडे केली आहे, तर बोयांच्या आधारे चॅनल आखून त्यातूनच ही जलवाहतूक कायमस्वरूपी करावी, पर्यायाने मच्छीमारांना त्याचा त्रास होणार नाही, अशी विनंती त्यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे अलिबाग किनारपट्टीवरील पर्यटन व हॉटेल व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.(लोकसत्तावरून)