रायगड जिल्हयात बेकायदा दारू निर्मिती आणि विक्री कऱणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून त्याला आळा घालण्यासाठी आता पेण तालुक्यातील पाबळ खोऱ्यातील महिलांनीच कंबर कसली आहे.तंटामुक्त समिती आणि पोलिसांच्या मदतीने महिलांनी हातभट्टयांच्या विरोधात धडक मोहिमच उघडली आहे.
आदिवासी आणि दुर्गम भागात असलेल्या पाबळ खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढली जाते.त्यामुळे युवा पिढी व्यसनाधिन होत आहे.अनेकांचे आयुष्य उदध्वस्थ झालेे आहे . याला पायबंद घालण्यासाठी आता महिलांनी पुढाकार घेतला असून जो बेकायदा दारू काढेल त्याला 50 हजार रूपये दंड आकारण्यात येत आहे.या दंडाच्या रक्कमेतून 25 हजार रूपये बेकायदा दारू अड्डे तसेच दारू विक्रेत्यांना पकडून देणाऱ्यांना तर उर्वरित रक्कम गावच्या विकासासाठी वापरली जाणार आहे.या अनोख्या मोहिमेचा सकारात्मक परिणाम पाबळ खोऱ्यात जाणवायला लागला असून गावकीच्या भितीने अनेक बेकायदा दारू तयार करणाऱ्यांनी आपले धंदे बंद केले आहेत.परिणामतः विभागाची दारूमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा केला जात आहे. महिलांनी पुढाकार घेत दारूविरोधी उघडलेल्या आघाडीचे जिल्हयात सर्वत्र कौतूक आणि स्वागत होत आहे.