महाराष्ट्रात वर्षभरात 72 पत्रकारांवर हल्ले,
6 दैनिकांची कार्यालयं फोडली,दोघांच्या हत्त्या
मुंबई दिनांक 24 ( प्रतिनिधी) महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी 2014 हे साल सत्वपरीक्षा पाहणारे ठरले.वर्षभरात राज्यात 72 पत्रकारांवर हल्ले झाले,2 पत्रकाराचे खून झाले,मुंबईत एका पत्रकाराचे अपहरण झाले,2 महिला पत्रकारांच्या घरावर हल्ले आणि अन्य किमान 4 महिला पत्रकारांचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत.राज्यातील प्रतिष्ठित अशा सहा दैनिकांच्या कार्यालयावर समाजकंटकांनी हल्ले चढवून कार्यालयांची मोडतोड केली,तर पत्रकारांवर पोलिसांनी खोटे खटले भरण्याचे किमान बारा प्रकार समोर आले आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.गतवर्षी 63 पत्रकारांवर हल्ले झाले होते त्यात यंदा हल्ल्याच्या 8 घटनांची भर पडली आहे.विशेष म्हणजे राज्यात युतीचे सरकार आल्यानंतरच्या गेल्या दीड महिन्याच्या काळात पत्रकारांवरील हल्ल्याच्या 21 घटना घडल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याची गेल्या चार वर्षांपासून नोंद ठेवली जाते.राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या सर्वच घटना समितीपर्यत पोहचतात असे नसले तरी ज्या घटनांची माहिती समितीला मिळते त्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाल्याचे समोर आले आहे.जालना येथील पत्रकार विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूर यांची 22 मे रोजी हत्त्या करण्यात आली आहे.दुसऱ्या घटनेत ठाणे जिल्हयातील लोकमतचे अंशकालिन वार्ताहर शिवसिंह बाबूलाल ठाकूर यांनाही ठार कऱण्यात आले आहे.अनिल जोशी या मुंबईतील पत्रकाराचे अपहरण कऱण्यात आले होते.नंतर त्यांना सोडण्यात आले.पनवेल येथील चेतना वावेकर,रत्नागिरी येथील मयुरी सुपल,आणि पिंपरी-चिंचवड येथील अश्विनी सातव डोके यांच्या घरावर समाजकंटकांनी हल्ले केले.मुंबईत चार वेगवेगळ्या घटनांमध्ये महिला पत्रकारांचा विनयभंग केला गेला,त्यातील एका महिला पत्रकाराला बलात्काराची धमकी दिली गेली.वर्षभरात राज्यात सहा प्रतिष्ठित दैनिकांच्या कार्यालयावर हल्ले झाले.त्यात देशोन्नती ( भंडारा कार्यालय) ऐक्य,सकाळ ( फलटण कार्यालय) सामनामध्ये प्रसिध्द झालेल्या बेताल बडबड या अग्रलेखाने संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्यार्ंनी मुंबईतील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक केली,12 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या दैनिक भास्करच्या कार्यालयावर हल्ले करून तेथील साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली गेली.
राज्यात ज्या 72 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत त्यातील प्रमुख घटना पुढील प्रमाणे आहेत.सागर मेघे ( नवी मुंबई) रमेश काबळे ( अलिबाग ) गोकुळदास येशीकर ( खोपोली) दिलीप राय ( मुंबई) सचिन लोंढे( सकाळ वालचंदनगर ) संजय प्रसाद ( मुंबई) आशिष बोरा ( कर्जत-नगर) तुषार खरात ( सकाळ ) विनोद कळसकर ( देशोन्नती अकोला) विजय मिश्रा (शेगाव) रवी कोटंबकर ( मुंबई)सागर वैद्य ( मुंबई) दि नेश लिंबकर ( बीड) सचिन यादव ( खोपोली)शिरीष वाकटानिया ( मीड-डे मुंबई) संतोष भागवत ( श्रीगोंदा) संतोष लोहकर ( लोकमत समाचार लोहा-नांदेड) प्रवीण तुपसौदर ( टेंभुर्णी जि.सोलापूर आजच यांच्यावर हल्ला झाला ).पोलिसांनी खोटे खटले दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी कऱण्याच्या ज्या बारा घटना वर्षभरात घडलेल्या आहेत त्यातील अलिकडची घटना म्हणून औरंगाबाद येथील आयबीएन-लोकमत वाहिनीचे ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम यांच्या नावाचा उल्लेख करता येईल.वरील हल्ल्याच्या घटनांपैकी बहुतेक हल्ले हे केवळ बातमी विरोधात छापल्याच्या काऱणांवरूनच झाले आहेत.काही घटना व्यक्तिगत कारणांमुळे घडल्या असल्यातरी त्यांची संख्या नक्षण्य असल्याचे दिसून आले आहे.या शिवाय बहुतेक हल्ले हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनच झाल्याचे वास्तवही समोर आलेले आहे.वर्षभरात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने सहा तरूण पत्रकारांचे ह्रदयविकाराने निधन झाल्याचेही उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.
– कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल आपण ज्या राज्यांना नेहमी नावं ठेवतो त्या राज्यांपेक्षाही पुरोगामी आणि लेखन,विचार आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा नेहमीच पुरस्कार कऱणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकाराची स्थिती चिताजनक असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच महाराष्ट्रात पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गेली पाच वर्षे करीत आहे.मात्र ज्या सहजतेने या कायद्याचं कवच वैद्यकीय सेवेतील लोकांना दिले गेले तसे संरक्षण पत्रकारांना द्यायला सरकार तयार नाही याचं काऱण पत्रकारांवर हल्ले कऱणारे बहुतेकजण हे राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्तेच असतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे समितीचे पदाधिकारी उपोषणास बसले होते त्यावेळेस कायदा कऱण्याचे आश्वासन दिले होते,एखनाथ खडसे यांनी तर तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सहयाद्रीवर भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली होती,केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही वेळोवेळी पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याचे आश्वासन दिलेले आहे.ही सारी वस्तुस्थिती आणि पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांचा लक्षात घेऊन महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा अशीही मागणी एस.एम.देशमुख यांनी या पत्रकाव्दारे दिली आहे.