महाबळेश्वरला काय पहाल ?

0
1229

दिवसभर आळसलेली,काहीसी उदास वाटणारी महाबळेश्वरची बाजारपेठ सायंकाळी नव्या नवरीसारखी साज- श्रृगार करून सजलेली असते.या बाजारपेठेचे रात्रीचं प्रसन्न, टवटवीत रूप जेवढं मोहक तेवढंच आकर्षक असतं.बाजारपेठेतली रात्रीची रौनक महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांचा दिवसभराच्या दऱ्या खोऱ्यातील भटकंतीचा थकवा घालविणारं नक्कीच असतें . प्रतापगड,सनसेट पॉईंट,विल्सन पॉईंट आणि अशीच दिवसभर भटकंती केल्यानंतर नक्कीच थकायला होतं.मात्र पर्यटक कितीही थकला तरी तो रात्री बाजारपेठेत मनसोक्त भटकंती करायचं सोडत नाही.त्यामुळं दिवसभर ओस पडलेली महाबळेश्वरची ही बाजारपेठ रात्री मुंबईतील लोकलसारखी खचाखच भरलेली असते.रंगीबेरंगी पोषाख केलेले शेकडो पर्यटक बाजारपेठेच्या या टोकापासून त्या टोकापर्यत किती वेळा जात येत असतील ते सांगता येत नाही.उन्हाळ्यात बाजारपेठेतील ही चहल-पहल अगदी रात्री अकरा-साडेअकरापर्यत बघायला मिळते.पावसाळयात किंवा थंडीत तुलनेत बाजारपेठ लवकर झोपी जाते.अर्थात थंडी असू देत की,पाऊस महाबळेश्वरच्या बाजारात एकतरी फेरफटका मारला नाही असे पर्यटक अभावानेही सापडणार नाहीत.महाबळेश्वरशी आमचं तर एक भावनिक नातं आहे.आमच्या संसाराची सुरूवात महाबळेश्वरपासूनच झाली आहे.त्यामुळं मी आणि एसेम आम्ही बऱ्याचदा महाबळेश्वरला जातो.तेथील पॉईंटसं अनेकदा पाहिलेले असल्यानं त्याचं आकर्षण नाही पण बाजारपेठेचं आकर्षण मात्र कमी होत नाही. किंबहुना बाजारात फिरायला आणि शॉपिंगलाच आम्ही महाबळेश्वरला जातो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बऱ्याचदा वाकडी वाट करून आम्हा महाबळेश्वर गाठतो.आपण महाबळेश्वरला गेला नसाल तर किमान बाजारपेठेतील भटकंतीचा आनंद घेण्यासाठी तरी नक्की एकदा महाबळेश्वरला जाचं…

शोभना देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here