प्रादेशिक वृत्तपत्रांतही “टॉप फाईव्ह’मध्ये समावेश
नवी दिल्ली – देशातील प्रादेशिक वृत्तपत्रांतील एकाच आवृत्तीचा सर्वाधिक खप असणाऱ्या “टॉप फाईव्ह’ वृत्तपत्रांमध्ये “सकाळ’ पुणेने (रोज साडेपाच लाखांहून जास्त प्रती) स्थान पटकावले आहे. “आरएनआय’च्या 2013-14 च्या अहवालानुसार सर्वाधिक खपाच्या 10 वृत्तपत्रांत मराठीतील “सकाळ’हे एकमेव दैनिक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे असूनही देशात वृत्तपत्रांची वाढ 9.99 टक्के या वेगाने होत असल्याचे व दरवर्षी त्यात किमान साडेपाच हजार वृत्तपत्रांची भर पडत असल्याचेही हा अहवाल सांगतो. त्याचप्रमाणे सर्वांत जास्त प्रकाशने प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य ठरले आहे. दैनंदिन वृत्तपत्र वितरणात आघाडीवर असलेल्या सहा भाषांत मराठीने पाचवे स्थान पटकावले आहे.
देशातील वृत्तपत्रांच्या नोंदणीचे सर्वाधिकार असलेल्या “आरएनआय’ म्हणजेच “रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया’च्या “प्रेस इन इंडिया’ या ताज्या अहवालातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. “आरएनआय’च्या 2013-14 च्या अहवालानुसार हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रे वगळता मराठीतील एकमेव “सकाळ’चा क्रमांक (रोज 5 लाख 51 हजार 465 प्रती) पहिल्या पाचांत आहे. आनंदबाझार पत्रिका (11, 81, 112), अहमदाबादमधील “गुजरात समाचार’ (5, 62, 405) ही वृत्तपत्रे आघाडीवर आहेत. वर्तमान (कोलकता) व “सकाळ’पाठोपाठ तमिळनाडूतील तंती, हैदराबादचे इनाडू, जालंधरचे अजित, भुवनेश्वरचा संवाद, मल्याळम मनोरमाची कोची आवृत्ती, बंगळूरूतील प्रजावाणी कन्नडा व जम्मूच्या उडान (उर्दू) या वृत्तपत्रांचा क्रमांक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार गेल्या वर्षात नोंदणीकृत हिंदी-इंग्रजी वृत्तपत्रांची संख्या 13,761; तर नियतकालिकांची संख्या 85, 899 पर्यंत वाढली आहे. राज्यवार माहितीनुसार उत्तर प्रदेश (15,209) पाठोपाठ महाराष्ट्रात (13 375) सर्वाधिक वृत्तपत्रे व नियतकालिके प्रकाशित होतात. भाषक वृत्तपत्रांबाबत हिंदी व इंग्रजी पाठोपाठ मराठीने (7155) क्रमांक राखला आहे.
सर्वाधिक आवृत्त्या व सर्वाधिक खप याबाबतीत हिंदीतील भास्कर (35 आवृत्त्या) व इंग्रजीतील “टाईम्स ऑफ इंडिया’ (29 आवृत्त्या) ही दोन वृत्तपत्रे अग्रस्थानी आहेत. आनंदबाझार पत्रिकेने देशातील सर्व भाषांत सर्वाधिक प्रती असलेल्या दैनिकांत अव्वल स्थान पटकावताना “टाईम्स’ (मुंबई-दिल्ली आवृत्त्या) व हिंदुस्तान टाईम्स (दिल्ली) यांना मागे टाकले आहे. हिंदीत पंजाब केसरी व नवभारत टाईम्स ही सर्वाधिक खपाची दैनिके ठरली आहेत. एकूण दैनिकांपैकी हिंदी वृत्तपत्रांचे दैनिक वितरण 12 कोटी 66 लाख 09, 253 इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्रजी दैनिकांचा खप जवळपास सव्वातीन कोटी व उर्दू दैनिकांचे वितरण पावणेतीन कोटींच्या आसपास आहे. मराठी दैनिकांनी या यादीतही 1 कोटी 28 लाख 11, 512 इतका खप नोंदवून पाचवा क्रमांक मिळविला आहे.
‘आरएनआय’च्या अहवालाचे प्रकाशन माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. “आरएनआय’चे संचालक एस. एम. खान यांच्या म्हणण्यानुसार देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांची ही यादी त्या वृत्तपत्रांनी सादर केलेला वार्षिक लेखाजोखा (ऍन्युअल रिटर्न) आधार मानून तयार करण्यात आली आहे.
वाढ आनंददायी
वृत्तपत्रांच्या त्यातही भाषिक वृत्तपत्रांच्या वितरणात होणारी वाढ अत्यंत आनंददायी असल्याचे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी “सकाळ’ला सांगितले. वृत्तवाहिन्यांचा प्रभाव जास्त वाटत असला तरी विश्वासार्हतेबाबत वृत्तपत्रांचेच स्थान अबाधित असल्याचे निरीक्षण नोंदवून जावडेकर म्हणाले, “”काही वृत्तवाहिन्या एकच दृश्य 500-500 वेळा दाखवतात हे लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. वृत्तपत्रे नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शी व ऑनलाइन करण्यात येणार असून, “आरओएनआय’ संकेतस्थळही अधिक अत्याधुनिक बनविण्यात येईल.’