मराठी पत्रकार परिषद..सर्वांची…सर्वांसाठी…

0
859

परिषदेचा लढा आणि 16 चं आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची..

संघर्ष हा मराठी पत्रकार परिषदेचा स्थायीभाव आहे.ज्यांनी परिषदेचा इतिहास वाचला असेल त्याना याची जाणीव आहे की,परिषदेचे नेतृत्व ज्या ज्या महान पत्रकारानी केलं ती सारी चळवळीतून पुढे आलेली मंडळी होती.त्यामुळं आपल्या हक्कासाठी,पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी आणि लेखन स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी रस्त्यावर उतरण्याचं बाळकडू  पुर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे.त्यातूनच लढाऊ पत्रकारांची संघटना म्हणून परिषद नावारूपाला आली आहे.परिषद केवळ लढेच करते असं नाही तर हे लढे यशस्वी करून दाखविण्याची हिंमतही केवळ परिषदेमध्येच आहेच हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे . . गेल्या अडीच वर्षात परिषदेने पत्रकारांसी संबंधित 19 प्रश्‍न सोडवून घेतले आहेत.त्यात पत्रकार संरक्षण कायद्याचाही समावेश  आहेच.परिषदेशी जोडल्या गेलेल्या जिगरबाज आणि संस्थेशी एकनिष्ठ सदस्यांच्या बळावरच हे यश आपल्याला संपादित करता आलेलं आहे.संस्थेची जी आंदोलनं होतात,जे कार्यक्रम होतात,जे उपक्रम संस्था राबवित असते त्याच्या यशाचं श्रेय देखील सर्व सद्सायचंच आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही.

16 तारखेलाही वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न,पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि मजिठियाची अंमलबजावणी हे सर्वसमावेशक  प्रश्‍न घेऊन राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.एका  गोष्टीची आपण नोंद घेतली पाहिजे की,मराठी पत्रकार परिषदेला आपण मातृसंस्था म्हणत असू तर या संघटनेला सर्वसमावेशक अशीच भूमिका घ्यावी लागेल आणि ती नेहमी घेतली जाते  त्यामुळंच परिषदेबरोबर श्रमिक पत्रकार आहेत,मुक्त पत्रकार आहेत,मालक संपादक आहेत,साप्ताहिकवाले आहेत दैनिकवालेही आहेत.टीव्हीचे पत्रकार आहेत,एवढंच नव्हे तर ऑनलाईन पत्रकारही परिषदेचे सदस्य आहेत.या सर्वानी मिळून परिषदेला वैभव मिळवून दिलेलं आहे.परिषद ही जर पत्रकारितेतील कोणत्याही एका घटकाची नसेल तर सर्व घटकांचे हितसंबंध सांभाळणे हे परिषदचं कर्तव्यच आहे.’माझाच विषय घ्या,इतरांचा नको’ अशी भूमिका व्यक्तीगत पातळीवर एखादी व्यक्ती घेऊ शकते,परिषदेला अशी भूमिका घेता येणार नाही आणि ती कोणी मान्यही करणार नाही.त्यामुळं 16 तारखेचं आंदोलनही सर्व घटकांचे प्रश्‍न घेऊनच करतो आहोत.त्याला राज्यभर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.हे आंदोलन सर्वत्र यशस्वी देखील होणार आहे.असं असताना आपल्यामधीलच काही असंतुष्ट चुकीच्या आणि पत्रकारितेतील ठराविक वर्गाची तरफदारी करणार्‍या पोस्ट टाकत आहेत.त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत अशा पोस्टचा खुलासा करण्याचीही आम्हाला गरज नाही.परिषद हे आपले कुुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं सुख-दु:ख हे परिषदेचे सुख-दु:ख आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी.ज्यांना परिषदेची ही सर्वसमावेशक भूमिका मान्य नाही ते आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत.

आपणासर्वाना माहिती आहे की,पत्रकारांच्या प्रश्‍नासाठी मी माझ्या करिअरवर पाणी सोडून  लढतो आहे.केवळ प्रश्‍न सोडवून घेणे एवढाच या लढयाचा उद्देश नाही तर पत्रकाराची भक्कम एकजूट करणं आणि राज्यात एक प्रभावी दबावगट निर्माण करणं हा देखील आपल्या चळवळीचा एक उद्देश आहे.परस्परांबद्दल आदरभाव निर्माण कऱणं आणि परस्पराच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भावना वाढीस लावणे आणि यापुढं कोणताही पत्रकार एकटा किंवा एकाकी नाही याचा विश्‍वास सर्वांच्या मनात निर्माण करणं यासाठीही देखील प्रयत्न केले जात आहेत.पत्रकारांच्या आरोग्याचे प्रश्‍न असतील,पत्रकाराचे आर्थिक प्रश्‍न असतील हे विषय परिषदेने अग्रक्रमाने हाताळले असून गेल्या दीड वर्षात राज्यातील 26 पत्रकारांना जवळपास 30 लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे किंवा मिळवून दिली आहे. .3 डिसेंबरला परिषदेच्या वर्धापन दिनी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं देखील आपण आयोजित केलेली आहेत.ती यासाठीच..मात्र जे काहीच करीत नाहीत,किंवा ज्यांना परिषदेशी काही देणे-घेणे नाही,अशा व्यक्ती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अशा व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे असं मला वाटतं.

पत्रकार आणि पत्रकारितेच्या व्यापक हितासाठी सुरू असलेल्या या लढ्याला यश मिळवून देणं आणि .16चं आंदोलन यशस्वी करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.ती आपण समर्थपणे पार पाडाल याचा मला विश्‍वास आणि खात्री आहे.–

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here