मराठी पत्रकार परिषदेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक उद्या शनिवारी पुण्यात होत असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी दिली आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक असणार असून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांचे यावेळी विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.बैठकीस परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्हा अध्यक्षांनी तसेच परिषद प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे यांनी केले आहे.बैठक पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात होणार आहे.दुपारी 11 वाजता ही बैठक सुरू होणार आहे.
बैठकीत संघटनात्मक बाबी,तसेच घटनादुरूस्तीच्या विषयावर चर्चा होणार आहे.शिवाय या बैठकीत परिषदेचे पदाधिकारी नेमण्याबाबतही चर्चा होणार आहे.परिषदेशी सध्या राज्यातील 320 तालुका पत्रकार संघ जोडले गेलेले आहेत .मात्र या तालुकासंघांशी परिषदेचा थेट असा कोणताही संपर्क नसल्याने अनेक तालुका संघांना परिषदेच्या दररोजच्या कामकाजाची कल्पनाच नसते.त्यामुळे भविष्यात तालुका संघांशी थेट संपर्क जोडण्याची परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची कल्पना असून त्याची पूर्व तयारी म्हणून परिषदेच्या तालुका अध्यक्षांचा एक मेळावा मार्चमध्ये घेतला जाणार आहे त्यावर देखील चर्चा होणार आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीमध्ये मराठी पत्रकार परिषद ही महत्वाची भूमिका बजावत आहे.पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने 17 फेब्रुवारी रोजी राज्यातील डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्याचे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठीची आवश्यक ती तयारी देखील बैठकीत कऱण्यात येणार आहे.