हवेली,दिंडोरी,आकोट,जिंतूर,तासगाव,दापोली,रामटेक,कळंब
आदि तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे मानकरी ः
परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केली पुरस्कारांची घोषणा
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेले राज्यातील अनेक तालुका पत्रकार संघ आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत असतात.परिषदेने दिलेले उपक्रम राबविण्याबरोबरच अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो.राज्यातील अनेक तालुका संघांनी दुष्काळात लोकहोतोपयोगी अनेक कामं केली आहेत.तळी आणि नद्यातील गाळ उपसण्यापासून लोकांना पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच आणि शैक्षणिक कार्यापासून आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्याबरोबर अनेक कामं तालुका पत्रकार संघांनी केली आहेत,सध्याही ती चालू आहेत.मात्र त्यांच्या या कार्याची फारशी दखल घेतली जात नसल्याने ग्रामीण भागात पत्रकार संघांच्या माध्यमातून सुरू असलेले रचनात्मक कार्य लोकांसमोर येतच नाही.त्यातून पत्रकारांबद्दलच एक नकारात्मक भावना निर्माण होताना दिसते आहे.पत्रकार सामाजिक बांधिलकी जपत जी कामं करतात ती लोकांपर्यंत यावीत,त्यांच्या कार्याचं कौतूक व्हावं आणि अन्य तालुका पत्रकार संघांनाही प्रोत्साहन मिळावं यासाठी यंदापासून मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने परिषदेचे दिवंगत अध्यक्ष वसंतराव काणे यांच्या नावाने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देण्यात येणार आहेत.प्रत्येक महसूल विभागातून एका तालुक्याची निवड करून 25 डिसेंबर रोजी नांदेड येथे होत असलेल्या तालुका अध्यक्षांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तालुका संघांना सन्मानित केले जाणार आहे.आदर्श तालुका संघाची निवड करण्याची जबाबदारी परिषदेने आपल्या विभागीय सचिवांवर सोपविली होती.त्यासाठी काही निकषही नक्की केले गेले होते.त्यामध्ये संघटना वाढीसाठीचे प्रयत्न,परिषदेच्या आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आंदोलनातील सहभाग,सामाजिक उपक्रम,पत्रकारांसाठीचे विविध उपक्रम आदिंचा समावेश करण्यात आला होता.विविध तालुका संघांकडून प्राप्त प्रस्तावातून किंवा विभागीय सचिवांनी केलेल्या कार्य मुल्यमापनातून खालील तालुका पत्रकार संघांना यंदाचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज केली आहे.
पुणे विभाग ः हवेली तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा पुणे )
नाशिक विभाग ः दिंंडोरी तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा नाशिक )
अमरावाती विभाग ः आकोट तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा अकोला )
औरंगाबाद विभाग ः जिंतुर तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा परभणी)
कोल्हापूर विभाग ः तासगाव तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा सांगली )
कोकण विभाग ः दापोली तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा रत्नागिरी )
नागपूर विभाग ः रामटेक तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा नागपूर )
लातूर विभाग ः कळंब तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा उस्मानाबाद )
शाल,श्रीफळ,मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप असून वरिल तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष आणि त्यांच्या अन्य पदाधिकार्यांना 25 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्त नांदेड येथे सन्मानित करण्यात येणार आहे.पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व तालुका अध्यक्ष आणि पदाधिकार्यांचे परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी अभिनंदन केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित