मराठी भाषा गौरव दिनाचा
मराठी पत्रकार परिषदेचा संकल्प
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 1939मध्ये झाली..’ज्ञानप्रकाश’कार कृष्णाजी गणेश तथा काकासाहेब लिमये हे मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते.त्यानंतर नरहर रघूनाथ फाटक,जनार्दन सखाराम करंदीकर,’नवाकाळ’कार यशवंत कृष्णाजी खाडीलकर,दा.वि.तथा बाबुराव गोखले,श्रीपाद शंकर नवरे,त्र्यं.र.उर्फ मामासाहेब देवगिरीकर,ना.रा.बामणगावकर,पांडुरंग वामन तथा पा.वा.गाडगीळ,आचार्य प्रल्हाद केशव अत्रे,हे पहिले दहा अध्यक्ष होते.1950 मध्ये बेळगावात झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद आचार्य अत्रे यांनी भूषविले होते.या घटनेला आता सत्तर वर्षे झाली आहेत.अत्रे असतील किंवा त्यांच्या अगोदरच्या अध्यक्षांनी परिषदेच्या अधिवेशनात केलेली भाषणं त्या त्या काळाशी सुसंगत असली तरी तेव्हाची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत फार फरक पडलेला नाही हे ती भाषणं वाचल्यावर लक्षात येतं.पत्रकारिताच नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रात आभाळा एवढं कर्तुत्व गाजविलेले अनेक दिग्गज पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेचं अध्यक्षपद भूषविले याचा सार्थ अभिमान परिषदेला आहे.या मान्यवर पत्रकारांचे विचार नव्या पिढीच्या पत्रकारांपर्यंत पोहोचले पाहिजेत अशी परिषदेची इच्छा होती..तथापि आर्थिक अडचणींमुळं ती पुर्णत्वास गेली नाही..
आता पहिल्या दहा अध्यक्षांची भाषणं पुस्तक रूपानं प्रसिध्द करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेनं घेतला आहे.आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं हा संकल्प सोडताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.तरूण पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या या भाषणांचा हा खंड खरं तर सरकारनं प्रसिध्द करावा अशी आमची सरकारला विनंती असेल..पण सरकारला नाही जमलं तर मराठी पत्रकार परिषद हे शिवधनुष्य उचलेल..त्यासाठी लवकरच एक संपादक मंडळ नेमून पुढील कारवाई करण्यात येईल..हा संकल्प पूर्णत्वास गेल्यास एक अत्यंत महत्वाचा द्स्ताऐवज तरूण पत्रकारांना उपलब्ध होणार आहे..