लातूर जिल्हा :
लातुरातील सर्वच तालुक्यांत भूजल पातळी निव्वळ खोल गेलेली नाही तर १५२ गावांमधील सात पाणलोट क्षेत्रांत उपसा करण्यास पाणीच शिल्लक नाही. आता या गावांमध्ये नव्याने जलपुनर्भरण करण्याबाबत प्रस्ताव द्या, असे कळविण्यात आले आहे. लातूर तालुक्यातील २१; लातूर, चाकूर, शिरूरअनंतपाळ या भागांतील २२; चाकूर तालुक्यातील २३; निलंगा तालुक्यातील २१ व नजीकच्या औसा तालुक्यातील २६ गावांमध्ये पाणी उपसा करणे शक्य नसल्याचेही कळविण्यात आले आहे. वैजापूर व गंगापूर पट्टय़ातील ५५ गावांमधून पाणी उपसा करू नये, अशी सूचना करण्यात आल्याने या गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली की टँकरशिवाय अन्य कोणताच पर्याय असणार नाही.
जालना जिल्हा :
जालन्यातील भोकरदन व जाफराबाद तालुक्यांतील १४ गावांमध्ये अशीच शुष्कता आली आहे.
उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद व कळंब तालुक्यांतील १७, तर उमरगा तालुक्यातील ११ गावांमध्ये नव्याने विंधन विहिरी घेऊ नका, असे कळविण्यात आले आहे. जेथे पाण्याचा उपसा ८० ते ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे, अशा १९ पाणलोटांमध्येही वेगळ्या उपाययोजना हाती घ्याव्या लागणार आहेत. खासगी विंधन विहिरी घेणाऱ्या गाडय़ांना या गावांमधून बंदी घालावी, अशीही मागणी आहे. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल व भूजल सर्वेक्षण विभागाची यंत्रणाच नसल्याने अधिक खोल विंधन विहिरी घेऊन केला जाणारा उपसा या भागाचे वाळवंट होण्याचा प्रवास असेल, असेही सांगितले जाते.
जलपुनर्भरण अनिवार्य
ज्या पाणलोट क्षेत्रात शुष्कता आली आहे, तेथे साखर कारखान्यांची संख्या लक्षणीय आहे. लातूर जिल्हय़ातील १५६ गावांचा भोवताल कारखान्यांनी वेढला आहे. अहमदपूर तालुक्यात सिद्धिविनायक, रेणापूरमध्ये पन्नगेश्वर, रेणा हे दोन साखर कारखाने, लातूरमध्ये विकास आणि मांजरा, औसा तालुक्यात साई शुगर्स हे कारखाने सुरू आहेत. किल्लारी व मारुतीमहाराज हे कारखाने अजून सुरू झाले नसल्याची माहिती आहे. भोकरदनलाही रामेश्वर सहकारी साखर कारखाना आहे. ऊस नसतानाही कारखाना उभारला. त्यासाठी लागणारा ऊस अन्य भागांतून आणला जातो. वापरलेले पाणी व लावलेला ऊस याचे गणित लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी पापक्षालन म्हणून का असेना, जलपुनर्भरणाचे कार्यक्रम तातडीने हाती घ्यावेत, अन्यथा त्यांना गाळपाची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी केली जात आहे.(लोकसत्तावरून साभार)