देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी ( 17 सप्टेंबर 1948) मराठवाडा आणि जवळपास साडेपाच महिन्यांनी ( 31 जानेवारी 1948 ) मुरूड जंजिरा स्वतंत्र झाले,निझामाच्या अन्याय्य राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष करावा लागला.रक्तपातही झाला.नंतर भारत सरकारला लष्करी हस्तक्षेप ( यालाच मराठवाड्यात पोलिस ऍक्शन म्हणतात )करून निझामाचा पाडाव करावा लागला.जंजिऱ्याचा नबाब मात्र नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संस्थानातील जनतेच्या उठावाला एवढा घाबरला की, स्वातंत्र्य प्रेमी जनतेनं म्हसळा काबिज करताच नबाबानं पांढरं निशाण फ़डकविलं अन सामिलनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या.कोणताही रक्तपात न होता चार महिन्यांनी का होईना जंजिरा मुक्त झाले.मराठवाड्यात मुक्ती दिन साजरा केला जातो.मुरूडमध्ये हे होत नव्हतं.त्यासाठी रायगडमधील पत्रकारांनी पुढाकार घेत पाच- सहा वर्षांपासून 31 जानेवारीला जंजिरा मुक्ती दिन साजरा करायला सुरूवात केलीय.या लढ्यातील तेरा स्वातंत्र्यवीरांचा आम्ही 2009 मध्ये सन्मान केला होता.आम्हाला मानधन नको पण किमान स्वातंत्र्य सैनिक म्हणून दर्जा द्या ही त्यांची मागणी अनेक आश्वासनानंतरही पूर्ण झाली नाही.दोन्ही कडचा एक समान धागा म्हणजे हैदराबादचा निझाम असेल किंवा मुरूडचा नबाब असेल हे दोघेही पाकिस्तानच्या संपर्कात होते.त्यांना तिकडं जायचं होतं किंवा जमलं तर भारतातच स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व कायम ठेवायचं होतं.हे झालं नाही है देशाचं सुदैवच म्हणावं लागले.