औरंगाबादः दीव्य मराठी आणि भास्कर ग्रुपने पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्यांची मजिठियाच्या शिफारशीनुसारची थकबाकीची संपूर्ण रक्कम तीन महिन्याच्या आत देण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय औरंगाबादच्या कामगार न्यायालयाने दिल्याने दीव्य मराठीच्या कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सुधीर जगदाळे आणि अन्य कर्मचार्यांनी दाखल केलेल्या दाव्यावर निर्णय देताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्यांच्या वेतन निश्चितीसाठी नियुक्त केलेल्या मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारनं 11-11-2011 रोजी मान्य करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र देशातील वृत्तपत्रांच्या मालकांनी या शिफारशी अंमलात आणणे शक्य नसल्याचे कारण देत सुप्रिम कोर्टात रिट दाखल केले होते.मात्र सुप्रिम कोर्टाने हे सारे दावे फेटाळत 07-02-2014 रोजी मजिठियाची अंमलबजावणी करण्याचे आदेश मालकांना दिले होते.ज्यांनी रिट दाखल केले होते त्यामध्ये भास्कर वृत्तपत्र समुहाचाही समावेश होता.भास्करची याचिका फेटाळुन लावल्यानंतरही भास्करने मजिठियाची अंमलबजावणी केली नव्हती.त्यामुळे सुधीर जगदाळे आणि इतरांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.मात्र सुप्रिम कोर्टाने 17-02-2017 रोजी अवमान याचिका निकाली काढली मात्र मजिठियाच्या शिफारशीनुसार वेतन आणि आर्थिक लाभ देणे बंधनकारक असल्याने ते द्यावेत असे आदेश पारित केले होते.तसेच कर्मचार्यांनी मजिठियाच्या शिफारशीनुसार फरकाची रक्कम वसुलीसाठी लेबर कमिशनर यांच्याकडं वसुली दावे करता येतील असे आपल्या आदेशात नमुद केले होते.त्यानुसार सुधीर जगदाळे आणि इतरांनी दीव्य मराठीने फरकाची रक्कम देण्यास नकार दिल्याने कामगार आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे थकित वेतनाची रक्कम 28 लाख रूपये मिळण्यासाठी आणि वसुल करण्यासाठी दावा दाखल केला होता.या दाव्यावर प्रतिवाद करताना दीव्य मराठीच्या व्यवस्थापनाने हे कर्मचारी फरकाची रक्कम मिळण्यास पात्रच नसल्याची भूमिका कामगार आयुक्तांकडं मांडली होती.हे प्रकरण तडजोडीने न मिटल्यामुळं कामगार आयुक्तांनी न्यायनिवाडयासाठी कामगार न्यायालय यांच्याकडे पाठविले.न्यायालयाने दोन्ही बाजुंच्या साक्षीपुराव्याचे अवलोकन करून कर्मचार्यांची सर्व प्रकरणे मंजूर केली आणि दिव्य मराठी आणि भास्कर ग्रुपला मजिठिया वेतन आयोगानुसार मागील थकबाकीची रक्कम तीन महिन्याच्या आत देण्याचे आदेश पारित केले.या प्रकरणात सुधीर जगदाळे यांच्यावतीने अॅड.प्रकाश एम.शिंदे आणि अॅड.प्रशांत जाधव यांनी बाजू मांडली.या निकालामुळे दिव्य मराठीच्या कर्मचार्यांनी आनंद व्यक्त केला.