मंगेश चिवटे- एक सामाजिक बांधिलकी जपणारा तरूण पत्रकार
तरूण पत्रकार मंगश चिवटेचा आणि माझा परिचय तसा अलिकडचा.मात्र त्यांच्या कुटुंबाचा माझा जुना स्नेह आहे.चिवटे याचं घराणं तीन पिढ्यांपासून मराठी पत्रकार परिषदेशी जोडलं गेलेलं आहे ही माझ्यासाठी फार अप्रुपाची गोष्ट आहे.मंगशचे आजोबा परिषदेचे सदस्य होते,वडिल परिषदेचे आजही सदस्य आहेत,आता स्वतः मंगेशही परिषदेच्या आरोग्य सेवा कक्षाचा प्रमुख आहे. संघटनेशी बांधिलकी म्हणजे काय असते हे चिवटे कुटुंबांनी दाखवून दिलेले आहे.अलिकडे कपडे बदलावेत या वेगानं पक्ष,संघटना आणि निष्ठा बदलल्या जातात अशा स्थितीत चिवटे कुटुंब कायम परिषदेबरोबर आहे हे ही जाणवावे असे वेगळेपण आहे.परिषदेबरोबर अशी असंख्य कुटुंबं जोडलेली आहेत.मराठी पत्रकार परिषदेचं हेच खरं बलस्थान आहे असं मला वाटतं.
पत्रकारितेचा रिवाज असाय की,वडिल पत्रकार असतील तर आपल्या मुलानं या व्यवसायात येऊ नये असा बहुतेक पत्रकारांचा प्रयत्न असतो.मंगेशच्या वडिलांनी त्याला जाणीवपूर्वक पत्रकारितेत आणलं.मंगेशला आयएएस व्हायचं होतं.त्यासाठी त्याची खटाटोप सुरू होती.तयारीसाठी तो दिल्लीलाही गेला होता.मात्र विविध कारणांनी ते शक्य झालं नाही.त्यामुळं वडिलांच्या इच्छेनुसार मंगशेनं इलेक्टॉनिक माध्यमातून पत्रकारिता सुरू केली.केवळ वडिलांची इच्छा एवढंच कारण त्यामागं नक्कीच नाही.पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायीत्व पार पाडण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेऊनच मंगेशनं पत्रकारिता सुरू केली आणि त्या पध्दतीनं त्यानं कामही चालविलं आहे.बुम हातात घेऊन त्यानं अनेक सामाजिक प्रश्न तर हाताळलेच त्याच बरोबर उपेक्षित,वंचित,आणि गावकुसाबाहेरच्या लोकांच्या व्यथा त्यांनी प्रखरपणे मांडल्या,त्याना न्याय मिळवून दिला.पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील,आरोग्याचे प्रश्न असतील ,शिक्षणात येणार्या अडचणी असतील त्या जगाच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न मंगेशने केला.करीत आहे . मंगेश तेवढं करूनच थांबलेला नाही तर करमाळा तालुका पत्रकार संघाच माध्यमातून एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पत्रकार संघानं दत्तक घेतलेल्या या गावाला मी स्वतः भेट देऊन आलो आहे.हळुहळु या गावाचा चेहरा-मोहरा बदल आहे.मराठी पत्रकार परिषदेने प्रत्येक तालुका पत्रकार संघानं एक गाव दत्तक घ्यावे अशी संकल्पना ंमांडली आहे.त्या अगोदरच करमाळा तालुका पत्रकार संघाने गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न चालविला आहे.मंगेश चिवटे स्वभावाने हळवा,मितभाषी,संयमी असा पत्रकार आहे.मित्र जोडणं,सतत माणसात वावरणं,लोकांचे प्रश्न समजून घेत त्याची उकल कऱण्यासाठी आपल्यापरीनं प्रयत्न कऱणं हे मंगेशचे छंद आहेत . ते जोपासण्याचा मंगेशचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असतो.पत्रकारांच्या प्रश्नांच्या संदर्भातही तो सजग असतो.विशेषतः पत्रकारांना मदत करण्यासाठी तो सातत्यानं धडपडताना दिसतो.मराठी पत्रकार परिषदेने पत्रकार आरोग्य सेवा कक्ष सुरू केलेला आहे या मागची प्रेरणा ,आणि कल्पना मंगेश चिवटे यांचीच.त्या कक्षाचे प्र्रमुख म्हणून राज्यातील दहा ते बारा पत्रकारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न त्यानी केलेला आहे.अशा पध्दतीनं सामाजिक बांधिलकी जपत,पत्रकारितचा धर्म पाळत आणि अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे मंगेश चिवटे पत्रकारिता करीत आहेत.पत्रकारितेत असे असंख्य ध्येयवेडे तरूण पत्रकार आज आपल्या अवती-भवती दिसत असल्याने कोणी कितीही नाक मुरडले तरी पत्रकारितेबद्दलच्या सार्या आशा ,अपेक्षा संपलेल्या नाहीत हेच दिसते.
मंगेश चिवटेचा आज वाढदिवस आहे.त्याला शुभेच्छा देतानाच त्याच्या हातून समाजाची अधिकाधिक सेवा घडत राहो अशी अपेक्षा .(SM)