पुणेः भोर तालुका पत्रकार संघानं सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत केलेले कार्य उल्लेखनिय असून इतर तालुका संघांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
भोर तालुका पत्रकार संघाच्यावतीने एस.एम.देशमुख यांचा एका भव्य कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला त्यावेळी देशमुख बोलत होते.
भोर तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या नागरिकांचा भोर तालुका पत्रकार संघाच्यैावतीने गौरव करण्यात आला..त्याचा उल्लेख करून देशमुख म्हणाले,केवळ घडलेली बातमी लोकांपर्यंत पोहोचविणे एवढेच पत्रकारांचे काम नसून समाजाची दुःख,वेदनांना वाचा फोडणे आणि समाजातील चांगुलपणाचा सन्मान करणे हे देखील माध्यमांचे काम आहे हे कार्य भोर पत्रकार संघ उत्तम प्रकारे करीत आहे.समाजाच्या माध्यमांकडून मोठया अपेक्षा असतात,कुठंच न्याय मिळाला नाही तर किमान पत्रकार तरी आपल्याला न्याय मिळवून देतील अशी जनतेची धारणा असते लोकांचा माध्यमांवरील या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पध्दतीनं माध्यमांनी काम करावं असं आवाहनही देशमुख यांनी केलं.मागील दोन वेळा भोरला येता आलं नाही त्याबद्दल देशमुख यांनी दिलगिरी व्यक्त केली.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव बापुसाहेब गोरे,पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर,परिषद प्रतिनिधी एम.जी.ेशेलार,जिल्हा समन्वयक सुनील जगताप,उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,तहसिलदार अजित पाटील,भोर तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि शहरातील नागरिक,महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.