मराठी भाषेत इंग्रजी शब्दांची होणारी अनावश्यक लुडबूड मराठीच्या पडझडीसाठी जबाबदार असून प्रसारमाध्यमेही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याची खंत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली.
काळाघोडा महोत्सवात ‘पॉप्युलर प्रकाशन संस्थे’तर्फे आयोजित ‘साहित्य आणि प्रसारमाध्यमे’ या परिसंवादात ते बोलत होते. दूरदर्शनचे निवृत्त निर्माते रविराज गंधे आणि ‘झी २४ तास’चे संपादक उदय निरगुडकर यांनीही सहभाग घेतला. मराठी भाषेची पडझड होत असून त्याला दृक्श्राव्य माध्यमे मोठय़ा प्रमाणावर जबाबदार आहेत. वृत्तवाहिन्या इंग्रजी भाषेचा बेसुमार वापर करत असतात. यामुळे मराठी भाषेचा दर्जा खालावत आहे, याकडे कुबेर यांनी लक्ष वेधले. ‘बदलत्या काळानुसार इंग्रजी शब्दांना मराठी शब्दावली तयार करायला हवी. गेल्या काही वर्षांत ‘लोकसत्ता’ने प्रयत्नपूर्वक इंग्रजी शब्दांना नवे मराठी प्रतिशब्द तयार करण्याचे काम केले आहे. ‘माध्यमस्नेही’, ‘धोरण लकवा’, ‘मेणबत्ती संप्रदाय’ हे त्यापैकी काही शब्द असल्याचे कुबेर यांनी सांगितले. ‘हल्ली नवी पिढी वाचन आणि लिखाण करत नाही, हा समज निराधार आहे. तरुण पिढी चांगले वाचते आणि चांगले लिखाण करण्याचा प्रयत्न करते,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘मराठी प्रेक्षकांना चांगल्या साहित्यकृती दाखवल्यास ते नक्की बघतात. मात्र हल्ली व्यवस्थापकीय पदावर बसलेल्या व्यक्तींना साहित्य आणि कलाविषयक फारशी समज नसल्याने चांगल्या कार्यक्रमांची मांडणी होत नाही,’ अशी खंत रविराज गंधे यांनी व्यक्त केली. तर साहित्यावर आधारीत कार्यक्रम प्रेक्षकांसाठी करण्याचा नेहमीच प्रयत्न असल्याचे निरगुडकर म्हणाले. तिन्ही मान्यवरांची मुलाखत ‘पॉप्युलर’च्या अस्मिता मोहिते यांनी घेतली.
– See more at: http://www.loksa
ta.com/mumbai-news/girish-kuber-comment-on-marathi-media-1202243/#sthash.dpVQXb0c.dpuf