पाकिस्तानात दाखवले जाणारे विदेशी चॅनेल्स आणि केबल ऑपरेटरांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथोरिटी (PEMRA) ने घेतला आहे. येत्या काही महिन्यात पाकिस्तानी डीटीएच सेवा लॉन्च करण्यात येणार असून त्याआधी पेम्राने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने पेम्राचे (PEMRA) अध्यक्ष अबसार आलम यांचे वक्तव्य प्रसिद्ध केले असून त्यात म्हटले आहे, केबल ऑपरेटर्स आणि सॅटेलाइट चॅनेल्सला कायद्याच्या चौकोटीत राहुन वेळ देण्यात आला आहे. इंडियन डीटीएच डिलर्सविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येईल. पेम्राच्या एका बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पाकिस्तानातील भारतीय चॅनेल्स संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कोणालाही पाकिस्तानात इंडियन चॅनेलची सेवा देण्याची परवानगी देण्यात येणार नाही. पाकिस्तानात भारतीय डीटीएच डिकोडर्स विकण्याची परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी पेम्रा फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू, स्टेट बँक अँड एजन्सी आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांना पत्र पाठवून ही मागणी करणार असल्याची माहिती आलम यांनी दिली.
पाकिस्तानात जवळपास ३० लाख इंडियन डीटीएच डिकोडर्स पाकिस्तानात विक्री करण्यात आले आहे. इंडियन डिलर्स डिकोडर्सची पाकिस्तानात कशी विक्री केली जाते आहे, याचा तपास व्हायला हवा, असे आलम म्हणाले. पेम्राच्या कायद्याने केवळ १० टक्के (२४ तासांत २ तास ४० मिनिटे) विदेशी चॅनेल्सचे प्रसारण होऊ शकते. जर या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर केबल ऑपरेटर्सचे लायसन्स रद्द करायला हवे असे आलम यांनी सांगितले.
मटावरून साभार