2014-15 या आर्थिक वर्षात भारतीय वृत्तपत्र क्षेत्राची वाढ 5.8 टक्के झाली असून नव्या 5 हजार 817 प्रकाशनांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे एकंदर वृत्तपत्रे आणि नियतकालीकांची संख्या 1 लाख 5 हजार 443 इतकी झाली आहे, अशी माहिती ‘प्रेस इन इंडिया 2014-15’ या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा अहवाल दरवर्षी सादर करण्यात येतो.
भारतीय भाषांमध्ये हिंदी भाषेत सर्वाधिक वृत्तपत्रे आणि नियतकालीके आहेत. त्यांची संख्या 42 हजार 493 आहे. त्या खालोखाल इंग्रजीचा क्रमांक असून या भाषेतील 13 हजार 661 वृत्तपत्रे आणि नियतकालीके आहेत. देशात वृत्तपत्र, द्विसाप्ताहिक आणि त्रिसाप्ताहिक या श्रेणीत समाविष्ट होणारी 14 हजार 984 प्रकाशने असून नियतकालीक या श्रेणीत समाविष्ट होणारी 90 हजार 459 प्रकाशने आहेत.
2014-15 या वर्षात 34 प्रकाशने बंदही झाली आहेत, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र, एकंदर विस्ताराच्या तुलनेत बंद झालेल्या प्रकाशनांची संख्या नगण्य असल्याचे या अहवालावरून समजते.
वाचकसंख्येतही हिंदीची आघाडी
वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येतही हिंदी भाषेची आघाडी आहे. प्रतिदिन या भाषेत 25 कोटी 77 लाख 61 हजार 985 प्रति वाचल्या जातात. तर इंग्रजीची वाचकसंख्या 6 कोटी 26 लाख 62 हजार 670 आहे. देशात सर्व वृत्तपत्रांच्या मिळून प्रतिदिन 51 कोटी 5 लाख 21 हजार 445 प्रति निघतात.
आनंद बझार पत्रिका सर्वाधिक खपाचे
कोलकता येथून प्रकाशित होणारे आनंद बझार पत्रिका हे वृत्तपत्र खपात सर्वात आघाडीवर आहे. या वृत्तपत्राच्या 11 लाख 78 हजार 779 प्रती प्रतिदिन खपतात. तर हिंदीतील पंजाब केसरी या वृत्तपत्राच्या प्रतिदिन 7 लाख 42 हजार 190 प्रती खपतात. बहुआवृत्तीक वृत्तपत्रांमध्ये टाईम्स ऑफ इंडिया आघाडीवर असून त्याच्या इंग्रजीतील 33 आवृत्त्या आहेत. तर दैनिक भास्करच्या हिंदी भाषेतील 34 आवृत्त्या आहेत. सर्वाधिक खप असणाऱया नियतकालीकांमध्ये द संडे टाईम्स ऑफ इंडिया आघाडीवर आहे.