भारतीय जनता पक्षाने आज प्रसिध्द केलेल्या दृष्टीपत्र या जाहिरनाम्यात राज्यातील श्रमिक वृध्द पत्रकारांसाठी दरमहा 1500रूपये मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.मात्र पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भात जाहिरनाम्यात कोणताही उल्लेख दिसत नाही.पत्रकारांच्या प्रश्नाबाबत राजकीय पक्षाच्या जाहिरनाम्यात काही आश्वासन देण्याची ही पहिलीच वेळ असावी.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांना पत्र पाठवून पत्रकारांच्या प्रश्नंासंदर्भात आपल्या जाहिरनाम्यात आपली भूमिका स्पष्ट कऱण्याचे आवाहन केले होते.कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात उल्लेख नाही.मात्र भाजपने आपल्या जाहिरनाम्यात पत्रकार पेन्शनची मागणी मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.मानधन किती असावे हा वादाचा मुद्दा असला तरी भाजपने समितीची मागणी तत्वतः मान्य केल्याबद्दल समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख यांनी भाजपच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.शिवसेनेचा वचननामाही आजच प्रसिध्द कऱण्यात आला मात्र त्यात पत्रकारांच्या प्रश्नांकडे कानाडोळा कऱण्यात आला आहे.
जाहिरनाम्यात दिलेली आश्वासनं पाळली जात नाहीत हा नेहमीचा अनुभव आहे.असे असले तरी भाजपच्या या आश्वासनाचा सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असे समितीतर्फे स्पष्ट कऱण्यात आले आहे.