महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांच्या निधनाच्या बातमीला आज सर्वच मराठी वृत्तपत्रांनी ठळक स्थान तर दिलंच त्याच बरोबर बहुतेक वृत्तपत्रांनी पाडगावकरांवर अग्रलेख लिहिले आणि पानंच्या पानं मजकूर प्रसिध्द करून लाडक्या कवीला आदरांजली वाहिली.बातमीचे मथळे सजविताना रात्र पाळीच्या मुख्य उपसंपादकांनी पाडगावकरांच्या कविताचांच वापर केल्याचे दिसते.त्यामुळे सर्वच वृत्तपत्रांचे मथळे लालित्यपूर्ण झाले आहेत.लोकसत्तानं ‘कवितांच्या गावात आता धुकं,धुकं धुकं’ असा मथळा देत बातमी सजविली आहे.सामनानं ‘जीवणगाणं संपलं,जिप्सी निघून गेला’ असं बातमीला शिर्षक दिलं आहे.पुढारीनं ‘तु असा जवळी राहा’ असा मथळा देत पाडगावकरांच्या आठवणी जागविल्या आहेत.प्रहारनं ‘शुक्रतारा निखळला’ असा मथळा देत पहिल्या पानावर थोडी बातमी दिली आहे.सकाळनं ‘आनंदयात्रीला अखेरचा सलाम’ असा मथळा देत लाडक्या कविला श्रध्दांजली वाहिली आहे.महाराष्ट्र टाइम्सनं ‘सांगा कसं जगायचं’ असं म्हणत आपलं दुःख व्यक्त केलं आहे.मटानं अग्रलेख तर लिहिला आहेच त्याच बरोबर पहिल्या पानावर लताबाईंचा लेखही प्रसिध्द केला आहे.लोकमतनं’ हरपला, चांदणे पेरणारा कवी’ असं म्हणत सविस्तर बातमी दिली आहे.दीव्य मराठीनं ‘कुठे नेणार? कशासाठी, मी नाही विचारणार घरापुढे घुंगरताच काळोखात उतरणार’ असं म्हणत बातमी दिली आहे.दीव्य मराठीनं अंकाचं चांगलं ले आऊट केलं आहे.बहुतेक अग्रलेखांचे मथळेही काव्यात्म आहेत.लोकसत्तानं ‘त्यांनं सांधलं होतं एक आभा़ळ’ या शिर्षकाखाली अग्रलेख लिहिला आहे.महाराष्ट्र टाइम्सनं ‘धुक..धुक..धुक..’असं हेडिंग देत पाडगावकरांच्या जीवनप्रवास उलगडून दाखविला आहे.दीव्य मराठीनं फक्त ‘सलाम’ असं शिर्षक देत पाडगावकरांच्या जीवनाचं सार सांगितलं आहे.सामनानं ‘एक मैफिल संपल्याची खंत व्यक्त करीत पाडगावकरांच्या काव्याचा धाडोळा घेतला आहे.एका मराठी कवीच्या निधनानंतर एवढं सविस्तर कव्हरेज कदाचित पहिल्यांच मिळालं असावं.ते भाग्य महाकवी पाडगावरांच्या वाट्याला आलं.मराठी वाहिन्यांनी देखील अनेक महत्वाच्या बातम्या बाजुला ठेवत आपल्या लाडक्या कवीसाठी भरपूर वेळ दिल्याचे काल दिसून आले.
मराठी माणसाच्या निधनाची बातमी देताना नेहमीच कंजुषी क रणार्या टाइम्स ऑफ इंडियानं पाडगाकरांच्या निधनाची बातमी सचित्र दिली आहे.किमान पुणे आवृत्तीत पहिल्या पानावर बातमी आहे.हिंदुस्थान टाइम्स ने मात्र ही बातमी पाचव्या पानावर छापली आहे.