केबल नेटवर्क सनियंत्रण
जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न
अलिबाग, दि.08 (जिमाका) :- जिल्हास्तरीय खाजगी दूरचित्रवाणी ( केबल नेटवर्क) संनियंत्रण समिती पुनर्गठित करण्यात आली असून या समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, खाजगी दूरचित्रवाणी संनियंत्रण समिती श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच समितीचे सदस्य हर्षद कशाळकर, डॉ.मेघा घाटे, ऍ़ड. स्मिता काळे, प्र.प्राचार्य संजीवनी नाईक, पदसिध्द सदस्य- जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड यांचे प्रतिनिधी पोलिस निरीक्षक,पी. बी. गोफणे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले या बैठकीत मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, जिल्हयातील केबल नेटवर्कव्दारे दाखविण्यात येणारे कार्यक्रम, बातमी या आक्षेपार्ह असल्यास किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वाटल्यास याबाबत समितीने दखल घ्यावी.व त्याबाबत राज्य समितीकडे प्रस्ताव पाठवावेत. तसेच जिल्हयातील नागरिकांनाही असे काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांनीही याबाबतची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
केबल टेलिव्हीलन नेटवर्क (रेग्युलेशन ) ऍ़क्ट अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संनियंत्रण समिती कार्यरत आहे. तर जिल्हा स्तरावर जिल्हा संनियंत्रण समिती काम करते.असे सांगून या समितीच्या कामकाजाविषयीची माहिती डॉ.पाटोदकर यांनी प्रास्ताविकात दिली.तसेच समिती सदस्यांचे स्वागत केले. महिला दिनाचे औचित्य साधून समितीच्या अध्यक्षा श्रीमती शीतल तेली-उगले व महिला सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर अन्य सदस्यांना दृष्टीक्षेपात रायगड हे पुस्तक देऊन स्वागत केले.