मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याची धमकी
बेळगाव कलेक्टरांचा मराठी पत्रकार
परिषदेच्यावतीने निषेध
मुंबई दिनांक 25 (प्रतिनिधी ) सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून होणार्या अन्यायाच्या विरोधात सातत्यानं आवाज उठविणार्या मराठी वृत्तपत्रांवर ते सीमा भागातील वातावरण कलुषित करीत असल्याचं कारण देत कारवाई करण्याची धमकी जिल्हाधिकारी एन.जयराम यांनी दिली आहे.जिल्हाधिकार्यांच्या या दमदाटीचा मराठी पत्रकार परिषदेने कडक शब्दात धिक्कार केला असून असे कोणतेही पाऊल जिल्हाधिकार्यांनी उचलल्यास मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्रातील तमाम पत्रकार सीमा भागातील वृत्तपत्रांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात जयराम यांच्या अरेरावीचा निषेध केला असून त्यांची धमकी वृत्तपत्र स्वातंत्र्यांची गळचेपी करणारी आणि म्हणूनच लोकशाही विरोधी असल्याचे मत व्यक्त केले आहे.बेळगाव तरूण भारत असेल किंवा पुढारी आणि सकाळ असेल किंवा अन्य वर्तमानपत्रांनी नेहमीच सीमा भागातील मराठी बांधवांवर होणार्या अऩ्यायाच्या विरोधात आवज उठविला आहे.मराठी बांधवांना संघटीत करण्याचे,अन्यायाच्या विरोधात उभे कऱण्याचे कामही मराठी वृत्तपत्रांनी केले आहे.मराठी वृत्तपत्रे आणि पत्रकारांची ही कामगिरीच आता कर्नाटक सरकारच्या डोळ्यात खूपत असून मराठी वृत्तपत्रांचा आवाज बंद करण्याचे कारस्थान रचले जात आहे.असा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार खपवून घेणार नाहीत असा इशारा परिषदेने दिला आहे.मराठी वृत्तपत्रांमुळे नाही तर बेताल मंत्री आणि जयराम यांच्यासारख्या ताळतंत्र सोडलेल्या अधिकार्यांमुळे सीमा भागातील वातावरण कलुषित होत आहे.त्यांनी आपल्या जीभेला लगाव घालावा अशी ताकिदही परिषदेने दिली आहे.सीमा प्रश्नी महाराष्ट्रातील पत्रकारानी नेहमीच सीमा भागातील जनतेबरोबर राहण्याची भूमिका घेतली आहे.मराठी पत्रकार परिषद आणि राज्यातील पत्रकारांची आजही तीच भूमिका कायम असून जयराम यांनी काही अगळीक केलीच तर मराठी पत्रकार शांत राहणार नाहीत असा इशाराही एस एम देशमुख यांनी दिला आहे.देशमुख यांनी आज बेळगावमधील काही मराठी पत्रकारांशी संवाद साधून जयराम नेमके काय बोलले याची माहिती करून घेतली,तसेच गरज पडल्यास नेमके काय करता येईल यावरही चर्चा केली आहे.
आधीचे वृत (सकाळच्या सौजन्याने )
मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचा बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
बेळगाव : जिल्हाधिकारी एन. जयराम यांचा मराठीव्देष पुन्हा उफाळून आला असून आता चक्क मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मराठी वृत्तपत्रांमुळे सीमाभागातील वातावरण कलुषित होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चातील मागण्यांचे निवेदन घेतल्यानंतर ते कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. जयराम म्हणाले, “वितरण वाढविण्यासाठी मराठी वृत्तपत्र मराठी आणि कन्नड भाषकांत तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसिध्द केल्या जात आहेत. समाजाच्या दृष्टीने ते चुकीचे असून मराठी प्रसार माध्यमांनी वास्तव मांडावे. अन्यथा वृत्तपत्रांवर कारवाई करावी लागेल.”
माणसांच्या हक्काच्या लढ्यात मराठी वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सरकार, प्रशासनाकडून होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी एन. जयराम यांचा मराठीद्वेष उफाळून आला आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्याला चालना देण्याचे काम मराठी वृत्तपत्रांतून होत असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाईची भाषा बोलली जात आहे.
सुमारे अडीच वर्षांपूर्वी उत्तर विभागाचे तत्कालिन पोलिस महानिरीक्षक भास्कर राव यांनीही मराठी वृत्तपत्रांवर कारवाईची भाषा केली होती. येळ्ळूर येथे जय महाराष्ट्र फलकावरून पोलिसांनी मराठी जनतेला अमानवी वागणूक दिली. घरात घुसून पुरूष, महिला, वृध्द आणि बालकांनाही मारहाण केली. या घटनेची गंभीर दखल घेत मराठी वृत्तपत्रांनी सविस्तर वृत्तांकन केले होते. त्यामुळे कर्नाटक पोलिसांची देशपातळीवर नाचक्की झाली होती. त्यामुळेच भास्कर राव यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्याच नैराशातून आता जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
मराठी कागदपत्रे, भाषिक अल्पसंख्याक आयोग, उच्च न्यायालयातील निकाल आणि जय महाराष्ट्रवरून पेटलेल्या वादामुळे जिल्हाधिकारी जयराम यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळेच त्यांनी मराठी वृत्तपत्र विपर्यास्त वृत्त प्रसिध्द करून मराठी व कन्नड लोकांत विस्तुष्ट निर्माण करत असल्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे.
तपासणी करणार
एकीकरण समितीच्या मोर्चात जय महाराष्ट्राचा गजर करण्यात आला. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास येतानाही जय महाराष्ट्रच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पित्त खवळलेल्या कन्नड पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना जय महाराष्ट्र म्हणणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर पोलिसांनी कोणत्या अटींवर मोर्चाला परवानगी दिली होती. त्या अटींचे उल्लंघन झाले का, याची तपासणी करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जयराम यांनी सांगितले.
जाहिर निषेध