बीबीसीच्या एका वृत्तनिवेदिकेचा राष्ट्रकुल बैठकीचं वृत्तनिवेदन करताना गोंधळ उडाला. यामुळे बीबीसीला माफी मागावी लागली. राष्ट्रकुल प्रमुखांचं थेट प्रक्षेपण सुरू असताना बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेनं श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांना पंतप्रधान मोदी म्हटलं. सिरिसेना बकिंगघम पॅलेसच्या प्रवेशद्वारासमोर गाडीतून बाहेर पडत असताना वृत्तनिवेदिकेनं चूक केली.
महाराणी एलिझाबेझ यांनी राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांसाठी जेवणाचं आयोजन केलं होतं. यासाठी मैत्रीपाल सिरिसेना बकिंगघम पॅलेसला पोहोचले. यावेळी ‘2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी बकिंगघम पॅलेसला पोहोचले आहेत,’ असे बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेनं म्हटलं. यानंतर बीबीसीच्या प्रवक्त्यांनी या चुकीबद्दल माफी मागितली. ‘थेट प्रक्षेपणादरम्यान आमच्याकडून चूक झाली. त्यासाठी आम्ही माफी मागतो,’ असं प्रवक्त्यांनी म्हटलं.