दळणवळणाच्या साधनांचा अभाव हे बीड जिल्हयाच्या आणि एकूणच मराठवाडयाच्या मागासलेपणाचं एक प्रमुख कारण आहे.रस्ते,हवाई वाहतूक किंवा रेल्वेची सुविधा ऩसल्यानं मोठे उद्योग बाडमध्ये आलेच नाहीत.एमआयडीसी देखील विकसित झाल्या नाहीत.त्यामुळं बे-रोजगारांचे तांडे इथं निर्माण झाले.अनेक सुशिक्षित तरूणही ऊस तोडणी कामगार म्हणून राबू लागले.जिल्हयातून आजही दोन-ते अडीच लाख तरूण ऊस तोडणीसाठी राज्यभर जात असल्यानं ‘ऊस तोडणी कामगारांचा पुरवठा कऱणारा जिल्हा’ हीच बीडची गेल्या पंचवीस वर्षात ओळख निर्माण झाली.उद्योग नसल्यानं शेती हाच बीड जिल्हयाचा प्रमुख व्वयवसाय.आजही बीडमधील 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जनता शेतीवरच अवलंबून आहे.मात्र गेली काही वर्षे शेती हा आतबट्यातला व्यवसाय झाल्याने शेतकर्यांच्या आत्मह्त्येचं सत्र बीडला सुरू झालं.जलसंधारणाच्या सुविधा नाहीत,पावसाचं प्रमाण कमी आणि जो पाऊस पडतो तो ही अनियमित.यामुळं शेती कमालीची बेभरवश्याची झाली.एखादया वर्षी चांगला पाऊस पडला तर नैसर्गिक आपत्ती पाचवीला पुजलेली असल्यानं इथली शेती आणि शेतकरी पूर्णतः उध्दवस्थ झालेली आहे.ही परिस्थिती बदलायची असेल तर शेतीवरचं अवलंबित्व कमी करून उद्योगाचे जाळे बीडमध्ये विणले जायला हवे होते.मात्र दळणवळणाची साधनंच नसल्यानं कोणतेही मोठे उद्योग बीडला यायला तयार झाले नाहीत किंवा येत नाहीत.जनता दरिद्री,अंधश्रध्द,अडाणी राहण्यातच बहुतेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध असल्यानं या अंगानं कधी विचारच झाला नाही.पुण्या-मुंबईतल्या वाचकांना खरं वाटणार नाही पण बीडच्या 60 टक्के जनतेनं रेल्वे पाहिलेलीच नाही,,ती मध्ये बसण्याचा तर विषयच नाही अशी स्थिती .देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होत आले तरीही बीडला रेल्वेचं दर्शन होत नसेल तर इथला विकास होऊ न देण्यात राजकीय हितसंबंध होते हे मान्य करावं लागतं.परळीला जोडणारा पंधरा-वीस किलो मिटरचा लोहमार्ग सोडला तर बीडमध्ये आज ही रेल्वे नाही.रस्त्यांची अवस्था न विचारलेली बरी.जे महामार्ग आहेत त्यांना महामार्ग का म्हणायचे ? असा प्रश्न पडावा अशी स्थिती..अंतर्गत रस्त्यांबद्दल तर आनंदी आनंदच.त्यामुळं रस्ते मार्गे बीडला जाणं म्हणजे मोठी शिक्षा असते.रस्ते नाहीत,रेल्वे नाहीत म्हटल्यावर हवाई वाहतूक असणं शक्यच नाही.मराठवाडयात मागील महिन्यात नांदेडला विमानसेवा सुरू झालीय.तत्पुर्वी केवळ औंरंगाबादलाच नियमीत विमानसेवा सुरू होती.विमानसेवा,रेल्वे सेवा असल्यानं औरंगाबादचा थोडा-फार विकास झाला असला तरी आता वाळुंज आणि परिसरातील बहुतेक काऱखाने बंद पडल्याने तिकडंही अस्वस्थतः आहेच.बीड,उस्मानाबाद,परभणी,हिंगोली,हे जिल्हे कायम मागास राहिले.विलासराव होते तोपर्यंत लातूरची भरभराट होत होती,पण त्यांच्यानंतर लातूरची झपाट्यानं पिछेहाट सुरू आहे.नांदेडची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.त्यामुळं बकालपण,शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी,गुन्हेगारी या सर्वाशी बीड आणि एकूणच मराठवाडयाचं नाव जोडलं गेलं.ही परिस्थिती बदलावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झालेच नाहीत.शंकरराव चव्हाण यांनी नांदेडवर लक्ष केंद्रीय केलं.जायकवाडीचा मोठा प्रकल्प त्यांनी मराठवाडयात राबविला पण त्याचं पाणी नांदेडला मिळेल यावर डोळा ठेऊनच.विलासरावांनीही लातूरचंच पाहिलं.मराठवाडयातील अन्य ज्या जिल्हयांना राज्याचं नेतृत्व कऱण्याची संधी मिळाली नाही त्या जिल्हयाचं बकालपण संपलं नाही.अल्पकाळ गोपीनाथरावांकडं उपमुख्यमंत्रीपद आलं त्यातून जिल्हयात काही कामं झाली पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.बीडचं मागासपण दूर काही झालं नाही..मराठवाडयातला सर्वात मागास,अविकसित जिल्हा हीच आजही बीडची ओळख आहे.
चित्र बदलत आहे..
सुदैवानं आता हे चित्र बदलायला लागलं आहे.पत्रकार दिनाच्या निमित्तानं बीड जिल्हयातील वेगवेगळ्या शहरांना भेटी देण्याचा योग आला.तेव्हा रस्त्याचं जाळं विणलं जात असल्याचं आणि बीड जिल्हा आता कात टाकायला सिध्द झाल्याचं जाणवलं.ज्या गतीनं आणि ज्या पध्दतीनं जिल्हयातील रस्त्यांची कामं सुरू आहेत ते पाहून मनोमन आनंद वाटला.उशिरा का होईना राज्यकर्त्यांना बीडला न्याय देण्याची सुबुद्धी सुचली हे पाहून समाधान वाटलं.बीड-नगर रेल्वेचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे.हाच वेग कायम राहिला तर पुढील दोन वर्षात बीडच्या ज्या जनतेनं रेल्वे पाहिलेली नाही त्या जनतेला रेल्वेत बसण्याची संधी मिळणार आहे.परळीला मुंबईशी जोडणारा सर्वात जवळचा हा मार्ग ठरणार तर आहेच त्याचबरोबर जिल्हयाच्या मध्यभागातून आणि बहुतेक तालुक्यातून हा लोहमार्ग जात असल्यानं जिल्हयाच्या विकासाला मोठी गती येणार आहे.वडवणी,धारूर,आष्टी-पाटोदा सारख्या अतिमागास तालुक्याचं चित्र बदलायला यामुळं मदत होणार आहे यात शंकाच नाही.या लोहमार्गाबरोबरच बीड जिल्हयात नवे नऊ राष्ट्रीय महामार्ग विकसित केले जात आहेत.बीडमधून जाणार्या सोलापूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकऱणाचं काम वेगानं सुरू आहे.हा मार्ग जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बीडहून अवघ्या दीड तासात औरंगाबादला जाणं शक्य होणार आहे.बीड,चौसाळा,गेवराई आदि तालुक्यांचा आणि शहरांचं भवितव्य बदलून टाकणारा हा महामार्ग ठरणार आहे.मुंबई-विशाखापट्टनम हा महामार्ग पूर्णत्वाकडे आहे.नगर ते नांदेड दरम्यान या महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झालं आहे.उर्वऱित काम अत्यंत वेगानं सुरू आहेत .पाडळशिंगीहून सोलापूर-औरंगाबाद रस्ताला जोडून पुढे गढी मार्गे हा महामार्ग माजलगावला जात आहे.पुढील पुलाची वगैरे कामं सोडली तर रस्ता आता सुसाट झाला आहे.या महामार्गामुळं अडगळीतलं माजलगाव मुख्य रस्त्याला जोडलं गेलं आहे.माजलगावहून आणखी एक महामार्ग जात आहे.तो खामगाव -पंढरपूर. केज,धारूर,माजलगावहून जाणार्या या महामार्गामुळं या तीनही तालुक्याचं चित्र भावी काळात बदललेलं दिसणार आहे.पूर्णतः सिमेटच्या या रस्त्याचं काम गतीनं सुरू आहे.बीड जिल्हयातून जाणारा हा रस्ता पुढं मंठा,परतूर,लोणार,मार्गे बुलढाणा आणि मेहकरला जाणार आहे.या रस्त्यामुळं विदर्भातल्या वारकर्यांना पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठीचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
अडगळीत पडलेली शहरं महामार्गावर येताहेत..
लातूर -धुळे हा एक महामार्ग विकसित होत आहे.लातूर-आडस-धारूर-वडवणी-पिंपळनेर-पाडळसिंगी मार्गाने हा रस्ता पुढे सोलापूर -औरंगाबाद रस्त्याला जोडला जाणार आहे.या रस्त्यामुळं महामार्ग म्हणजे काय असतं ? हे देखील ज्या परिसरातील गावांना माहिती नव्हतं ती सारी गावं आता मुख्य रस्त्यावर येणार आहेत.या रस्त्यामुळं धारूर,वडवणी,बीड तालुक्यातील कमालीच्या अविकसित गावांचा फायदा होणार आहे.मात्र पूर्वनियोजित प्रस्तावानुसार हा महामार्ग पिंपरखेड,कवडगाव मार्गे जाणार होता मात्र एका वरिष्ट सनदी अधिकार्याच्या दबावामुळं हा मार्ग आता ताडसोन्ना मार्गे जातोय असं सांगितलं जातंय.ताडसोन्ना हे त्या वरिष्ठ अधिकार्याचं गाव आहे.मात्र हा मार्ग कवडगाव मार्गे जाणंच अधिक उचित आहे असं पिंपरखेड येथील उपसंरपंच श्री.जोशी तसेच देवडी येथील सरपंच जालिंंदर झाटे यांनी सांगितले.
आणखी एक मार्ग होत आहे तो अंबाजोगाई-परळी-सोनपेठ असा.हा महामार्ग पुढे कल्याण -नांदेड मार्गाला जोडला जाणार आहे.याचा फायदा सोनपेठसारख्या परभणी जिल्हयातील अविकसित तालुक्याला होणार आहे.अहमदपूर ते जामखेड हा 125 किलो मिटरचा मार्ग देखील प्रस्तावित आहे.चाकूरहून येणार्या या महामार्गामुळं अंबाजागोई,केज,मांजरसुंबा या बीड जिल्हयातील तालुक्यांच्या विकासाला चार चांद लागणार आहेत.बीड जिल्हयातून पुढं जामखेडला जाणारा हा रस्ता बीड-नगर रोडला जोडला जाणार आहे.त्यामुळं अंबाजोगाई ते नगर हा अत्यंत त्रासदायक प्रवास बराच सुखकर आणि वेळीची बचत करणारा ठरणार आहे. बीडला नगरशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून अंमळनेर मार्गे जाणार्या रस्त्याकडं पाहिलं जातं.हा जुनाच रस्ता होता पण तो आता एवढा छान झालाय की,आपल्या पोटातलं पाणीही हलत नाही.अवघ्या दीड -पावणेदोन तासात नगरला पोहचणं या रस्त्यामुळं शक्य झालं आहे. घाटसावळीहून चौसाळ्याला जोडणारा मार्गही प्रस्तावित आहे.अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागातून हा रस्ता जाणार असल्यानं खडकी देवळा,पहाडी हिवरा ही कायम अडगळीत पडलेली गावं रस्त्यावर येणार आहेत.बीड -परळी हा जुनाच रस्त्ता आहे.गोपीनाथरावांच्या काळात हा रस्ता दुरूस्त झाला होता.आता पुन्हा तो खराब झाला आहे.मात्र हा रस्ता देखील आता चौपदरी होत आहे.परळी-नगर लोहमार्गाला समांतर हा रस्ता चौपदरी होईल तेव्हा वडवणी तालुक्याचा चेहरा-मोहरा बदललेला असेल.ही सारी कामं व्हायला वर्षे-दोन वर्षे लागतील पण हे रस्ते नक्की होणार हे आता स्पष्ट झालं आहे.
बीड जिल्हयातील अनेक तालुक्यांची अवस्था अशी आहे की,आडमार्गावर असल्यानं या तालुक्यांना चेहरा किंवा स्वतःची ओळखच नव्हती किंवा नाही.आता रस्त्याचं मोठं जाळं जिल्हयात विणलं जात असल्यानं बहुतेक तालुके महामार्गावर येत आहेत.त्याचा त्या त्या शहरांना आणि एकूणच तालुक्याच्या विकासाला फायदा होणार आहे.फळ किंवा भाजीपाला उत्पादनाला जिल्हयात मोठा वाव आहे.मात्र जवळ बाजारपेठ नसल्यानं शेतकर्यांना पाहिजे तसा दर मिळत नाही.त्यामुळं फळ बागायतीकडं शेतकर्यांचा म्हणावा तसा कल नाही.मात्र आता होणार्या लोहमार्गामुळं भाजी-पाला आणि फळं थेट पुण्या-मुंबईला घेऊन जाणं शक्य होणार आहे.रस्तयाबरोबर हॉटेल व अन्य उद्योगधंदे विकसित होणार आहेत.जमिनीच्या किंमती वाढणार आहेत,आणि रोजगाराच्या नव्या संधी जिल्हयातील जनतेला मिळणार असल्यानं ‘बीड जिल्हा कात टाकतोय’ असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
एवढे दिवस हे सारं का झालं नाही ?,किंवा जे होतंय ते कोणामुळं होतंय ? या काथ्याकुटीत जनतेला स्वारस्य नाही.दळणवळणाच्या साधनांचा गेल्या पन्नास वर्षातला बॅकलॉग भरून निघतोय ही जनतेसाठी मोठीच आनंदाची गोष्ट आहे.या सार्या बदलाचं मनापासून स्वागत केलं पाहिजे.मागास किंवा अविकसित भागात नवे उद्योग सुरू कऱण्यासाठी सरकार प्रोत्साहन देते,वेगवेगळ्या सवलती देते,अनुदान देते याचा लाभ घेत आणि बीड जिल्हा बदलतोय याची दखल घेत मोठ्या उद्योगांनी बीडमध्ये यायला आता कोणतीच हरकत नाही.या उद्योगाच्या स्वागतासाठी बीड जिल्हा आता सज्ज झाला आहे हे मात्र नक्की..-
एस.एम.देशमुख