महाराष्ट्रातील ज्येष्ठ म्हणजे वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना पेन्शन मिळावी ही मागणी मराठी पत्रकार परिषद गेली वीस वर्षे करीत आहे. ही मागणी आता मंजूर होण्याच्या टप्प्यावर असून 24 तारखेपासून सुरू होणार्या अधिवेशनात ही मागणी मंजूर होईल अशी शक्यता आहे.मात्र राज्यातील शासकीय कर्मचार्यांना पेन्शन देण्याची योजना बंद करण्यात आली आहे.अशा स्थितीत वयााची साठी ओलांडलल्या पत्रकारांना पेन्शन देता येणार नाही असं वित्त विभागाचं म्हणणं आहे.त्या ऐवजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना या नावाने योजना सुरू करून पत्रकारांना दरमहा आर्थिक मदत दिली जाईल असं सांगण्यात येत आहे.विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी 30 मार्च 2017 रोजी विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे पत्रकार पेन्शन योजनेकडे लक्ष वेधले होते.त्याला सामांन्य प्रशासन विभागाकडून 10 जुलेै 2017 रोजी पत्र आले असून त्यात जांभेकर सन्मान योजना सुरू करण्याचा सरकार विचार करीत असल्याचे म्हटले आहे.
परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी नागपूर येथील परिषदेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना पत्रकार पेन्शन सुरू करण्याची विनंती केली होती.त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अशी योजना सरकारच्या विचाराधीन असल्याचे म्हटले होते.येत्या अधिवेशन काळात ही योजना मार्गी लागेल अशी अपेक्षा असून पत्रकार संरक्षण कायद्यासाठी ज्या पध्दतीने परिषदेने प्रयत्न केला त्याच पध्दतीने पेन्शनसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
योजना कोणत्याही नावाने असली तरी वयोवृध्द पत्रकारांना किमान दहा हजार रूपये मासिक पेन्शन मिळावी आणि त्यासाठी अधिस्वीकृतीची अट असू नये अशी परिषदेची मागणी आहे.